Thursday, September 27, 2018

जतच्या राजे रामराव महाविद्यालयात तिसऱ्या दिवशीही प्राध्यापकांचा संप सुरूच

जत,(प्रतिनिधी)-
प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी मंगळवार दि.25 सप्टेंबर पासून बेमुदत संप सुरु आहे. राजे रामराव  महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाकडील सर्वच प्राध्यापकांनी संपामध्ये सहभाग घेतल्यामुळे संपाला शंभर टक्के पाठिंबा मिळाला आहे. आज तिसऱ्या दिवशीही संप सुरूच असून या संपाचा परिणाम विद्यार्थी वर्गावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. प्राध्यापक वर्गात नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.                                    महाविद्यालयातील या संपाला राष्ट्रीय  काॅग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष व विद्यार्थी संघटनांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा देतांना राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल माने म्हणाले की, शिक्षक हा राष्ट्राचा कणा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शासनाचे या संपाकडे वेळीच लक्ष देऊन संप मिटवावा, अशी मागणी केली.    
      राजे रामराव महाविद्यालयात वरिष्ठ विभागामध्ये 3500 विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. प्राध्यापकांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. प्रथम सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या असून अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार व् प्राध्यापक संघटनानी एकत्र बसून यांवर तोडगा काढावा अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून होत आहे. सूटा संघटनेचे स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा.अशोक हेरवाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.

No comments:

Post a Comment