Sunday, September 23, 2018

जत पूर्व भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील पूर्व भागातील डांबरी, खडीकरण झालेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अशा रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.
दळणवळणासाठी रस्ता महत्त्वाचा आहे. रस्त्यांना खरे तर रक्तवाहिनी म्हणतात.पण जत तालुक्यात या रस्त्यांचाच अभाव दिसत आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवर मामुली डागडुजी करून पैसे काढले जातात किंवा फक्त पैसेच खर्च केले जातात. प्रत्यक्षात रस्त्यावर काहीच काम होत नाही. त्यामुळे रस्ते वाहन चालवण्यालायक तर सोडाच चालण्यालायकही राहिलेले नाहीत, अशी परिस्थिती आहे. या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
बोर्गी फाटा ते अक्कळवाडी या चार किलोमीटरच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. उटगी ते बेळोंडगी या रस्त्याची अवस्थादेखील यापेक्षाही वेगळी नाही. उटगी-हळ्ळी, उमदी-जाडरबोबलाद, संख- अंकलगी-उटगी या रस्त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की दुचाकी आणि चार चाकी वाहने चालवताना चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. व्हसपेट-माडग्याळ-उमदी-चडचण या रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत.सध्या या साईडपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे,मात्र केवळ माती टाकून या साईड पट्ट्या भरल्या जात असल्याच्या तक्रारी अनेकांनी जिल्हा परिषदेकडे केल्या आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment