जत,(प्रतिनिधी)-
जत ग्रामपंचायतीची नगरपालिका होऊन आता पाच वर्षे
पूर्ण झाली आहेत. अलिकडेच पालिकेची दुसरी निवडणूक झाली, पण
अजूनही जत शहरातील वाहतुकीची समस्या सुटलेली नाही.
शहरातील व्यापारी पेठ आणि चौका-चौकातील वाहतुकीची
समस्या दिवसेदिवस जटील होत चालली असून बाजारपेठांतील वाहतुकीच्या समस्येने जतकर
हैराण झाले आहेत. याबाबत नगरपालिका, तालुका प्रशासन व वाहतूक
पोलीस यांनी संयुक्तरित्या बैठक घेऊन वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी निकालात
काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र यांना जाग कधी येणार असा प्रश्न आहे.
जत हे तालुक्याचे आणि नगरपालिकेचे मुख्यालय
आहे. गेल्या आठ-दहा वर्षात जत शहराचा विस्तार वाढत गेला, तशी
लोकसंख्या वाढत गेली. त्याप्रमाणे वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. आर्थिक
सुबत्ता येत चालल्याने किंवा नोकदरदार,व्यापारी यांचा शहरात
रहिवास वाढल्याने शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढत
आहे. पण त्यामानाने पार्कींगसाठी जागा मात्र उपलब्ध होताना दिसत नाहीत. त्यामुळे
लोक मग कुठेही आणि कशाही गाडया उभ्या करतात. त्यातून पुढे वाहतुकीला होणारा अडथळा
आणि वादावादीचे प्रकार हे रोजचेच झाले आहेत. याबाबत नगरपालिकेला काहीच वाटत नाही.
ट्रॉफिक पोलिस कर्मचारीदेखील कुठे असतात,याचा पत्ता नसतो.
जत शहरामध्ये गेल्या आठ -दहा वर्षात
वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली पण रस्ते मात्र तेवढेच आणि अरुंद राहिले
आहेत. शहरातील कोणत्याही रस्त्यांचे रूंदीकरण झालेले
नाही. नपा क्षेत्रात रस्ते अजूनही रस्तारूंदीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत. त्याबाबत
कोणताही विचार होत नाही. दुसरीकडे गेल्या काही वर्षात जत शहरात जी बांधकामे झाली.
त्यातही निवासी आणि व्यापारी संकुलांच्या ठिकाणी पार्कींगला जागा सोडलेली नाही.
त्यामुळे मुळातच त्या इमारतीत राहणार्या लोकांना गाडया पार्क करण्यासाठी जागा
नाही. त्यामुळे ही वाहने बिनधास्तपणे रस्त्यावरच उभी केली जातात. त्यातून पुन्हा
होणारी वाहतुकीची कोंडी हे नित्याचेच झाले आहे. जत बसस्थानकाच्या पाठीमागे बेलदार
गल्ली आहे,इथे रस्त्यावरच वाहने पार्किंग केल्याने हा रस्ताच
रहदारीसाठी बंद झाला आहे. शहरातल्या अनेक भागात अशी अवस्था आहे. अनेक गल्ली-बोळ
वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
शहरातील बसस्थानक, महाराणा प्रताप चौक,
जयहिंद चौक, मारुती मंदिर, बिळूर रोड चौक, सोलनकर चौक, निगडी
रोड चौक, संभाजी चौक, शिवाजी चौक या
प्रमुख ठिकाणीही वाहतुकीची मोठी समस्या आहे.
वाहतुकीच्या समस्येला अनेक घटक कारणीभुत आहेत. मुळातच नगरपालिकेने गेल्या पाच
वर्षात पार्कींगच्या समस्येकडे कधीही गांर्भियांने पाहिले नाही. वाहतुक पोलीसही वाहतुक सुरळीत करण्यापेक्षा भलताच कर वसुल करण्यालाच अधिक
प्राधान्य देत आहेत.जतच्या रिक्षाचालकांना कसलीही
शिस्त नाही. त्यांच्या पार्किंगचा प्रश्न सोडवण्याची गरज असून स्टेट बँकेजवळील
त्यांचा तळ उठवण्याची गरज आहे.अनेक रिक्षा या परवाना नसलेल्या आहेत.पण याकडेही
आरटीओ खाते किंवा पोलिस पाहायला तयार नाहीत.
शहरात स्वतंत्र भाजीमंडई बांधण्यात आली असली तरी
त्याचा वापर होत नाही. त्यामुळे मंगळवार पेठेत भाजीपाला विक्रीचा बाजार भरतो व
वाहतूक इइथे मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. बसस्थानक परिसरात पुन्हा
हातगाडेवाल्यांनी आपला विळखा घातला आहे. काळ्या-पिवळ्या गाड्यांनीही तिथेच तळ
मारल्याने वाहतूक कोंडी कायम होत आहे.जत शहरीतील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना
मोकळा श्वास कधी घेता येईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment