जत,(प्रतिनिधी)-
शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होत असताना आता त्यात डिझेल दरवाढीची भर पडली. त्यामुळे आर्थिक ताळेबंद सांभाळताना शेतकर्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दुसरीकडे शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने हा तोटा सहन करावा लागत आहे. देशात इंधनाचे दर वेगाने वाढत आहेत. मागील दहा ते बारा दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकर्यांनाही फटका बसत आहे. सध्या डिझेलचा दर प्रतिलिटर 80 रुपये झाला आहे. मागील दहा दिवसांची आकडेवारी पाहता त्यात तब्बल सात रुपयांनी वाढ झाली. डिझेल महागल्याने त्याचा थेट फटका शेतीला बसणार आहे. ग्रामीण भागात विजेची समस्या आहे. शेतीला पाणी देण्यासाठी काही काही शेतकरी डिझेल पंपाचा वापर करत असतात. त्यासाठी रोज पाच ते दहा लिटर डिझेल लागते. सातत्याने होणार्या दरवाढीने हा खर्च वाढत आहे. याशिवाय, मशागतीसाठी बैल जोड्याऐवजी ट्रॅक्टरचा वापर होत आहे. ट्रॅक्टरसाठीही डिझेल लागते, शेतमाल बाजार समितीमध्ये घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्चही वाढला. आधीच उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बियाणे, खते, शेतमजूर यांचा खर्च भागवताना मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांच्या माथी इंधन दरवाढ आली. याचा मोठय़ा प्रमाणावर फटका बसत आहे. ज्याप्रमाणे उत्पादन खर्च वाढत आहे, त्यातुलनेत उत्पन्न मात्र मिळत नाही. केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केला. तरी बाजारात डाळी, तेलबिया, अन्नधान्य आणि अन्य कृषिमालांची विक्री एमएसपीपेक्षा कमी भावाने होत आहे.
No comments:
Post a Comment