जत,(प्रतिनिधी)-
जत शहरासह तालुक्यात असलेल्या लहान दवाखान्यांपासून
ते मोठ्या हॉस्पीटल्सपर्यंत अनेक ठिकाणी कायदे धाब्यावर बसविले जात आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांना योग्य सेवा दिली जात नाही.
ज्यादा बिलाची आकारणी केली जाते. बिलाचे दरफलक
लावलेले दिसत नाही. लैंगिक तपासणी करण्याबरोबरच स्त्री भ्रूणहत्यादेखील
बिनबोभाट केली जात आहे.पण याकडे राजकीय व अन्य कारणांमुळे लक्ष
दिले जात नसल्याने या लोकांचे फावले आहे. शासकीय स्तरावर या खासगी
दवाखान्यांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
सांगलीतील चौगुले हॉस्पीटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या सांगलीतल्या
दवाखान्यांची झाडाझडती सुरू आहे. त्यात अनेक बाबीतून कायदे धाब्यावर
बसवले जात असल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी बेडची परवाने नाहीत,
तर काही ठिकाणी जादा बेड असल्याचे आढळून आले आहेत. त्याचबरोबर बीएएमएस, बीएचएमएस अशा डॉक्टरांची बॉम्बे
नर्सिंग अॅक्टखाली नोंदी नाहीत. तरीही
ते खुलेआम आंतररुग्णालय थाटून व्यवसाय करीत आहेत. वैद्यकीय कचर्याचा व्यवस्थित निपटारा केला जात नाही. मोठ्या हॉस्पिटलमध्येही
असेच अनेक पद्धतीने नियमांचे पालन केले जात नाही. याची खरे तर
चौकशी व्हायला हवी आहे.
अनेक दवाखान्यांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा
उडाल्याचे दिसून येते. स्टाफकडे शैक्षणिक पात्रता
नाही. रुग्णसंख्येच्या तुलनेत स्टाफ कमी आहेत. अशा अनेक उणिवा आढळून येत आहेत. या खासगी दवाखाना आणि
संबंधित डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला नसल्याने या
लोकांचे फावले आहे.
डॉक्टर मंडळींनी मोठमोठ्या इमारती उभ्या
केल्या आहेत. याचा पैसा वसुल करण्यासाठी रुग्णांना
अनेक कारणे पुढे करून आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. काही डॉक्टर
मंडळी रुग्ण शेवटच्या स्टेजला असला तरी अॅडमिट करून घेऊन अव्वाच्या
सव्वा फी आकारतात आणि शेवटी सांगली-मिरजेला घेऊन जावा,
असे सांगतात, अशा तक्रारी आहेत. मात्र यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने त्यांच्यावर कोणत्याच प्रकारे कारवाई
होत नाही. चोवीस तास सेवा म्हणणारे डॉक्टर ऐनवेळी दवाखान्यात
येत नाहीत, अशाही तक्रारी आहेत. काही शासकीय
सेवेत असलेले डॉक्टरांनी आपली दवाखाने थाटली आहेत. मात्र ही मंडळी
नेमून दिलेल्या ठिकाणी जात नाहीत. आपल्या खासगी दवाखान्यातच अधिक
काळ प्रॅक्टिस करत असल्याचे आढळून येत आहे. कित्येक डॉक्टरांविरुद्ध
तक्रारी गेल्या आहेत,पण तरीही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने
ग्रामस्थ हतबल झाले आहेत.
सांगलीतील स्त्री भ्रूणहत्याप्रकरणातून
प्रशासनाने बोध घेऊन फक्त सांगलीच नव्हे तर जत तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच खासगी
दवाखान्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. यात
दोषी आढळणार्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment