Sunday, September 16, 2018

महामंडळाने प्रवाशाची आर्थिक लूट थांबवावी

जत,(प्रतिनिधी)-
जत ते वल्लभनगर या एसटी सेवेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या लोकांची आर्थिक लूट सुरु आहे. ही लूट महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकींगच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबतची लेखी तक्रारीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी सांगलीच्या विभागीय नियंत्रक यांच्याकडे दिली आहे.
           ढोणे यांनी दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, वल्लभनगर(पुणे)-जत ही बस  वल्लभनगर स्थानकावरून रात्री दहा वाजता निघते. या बसमधून जत तालुक्यातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक  व अन्य प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. या बससाठी  ऑनलाईन बुकींगची सुविधा असून  बुकिंग करताना  संगणकावर  मात्र साधी बस दर्शविले जाते. यावेळी तिकीट दर ४३५ रुपये दाखवून आरक्षण केले जाते.पण प्रत्यक्षात प्रवास करतेवेळी वाहकाकडून सदरची एसटी शिवशाही पद्धतीची असल्याचे सांगून तिकिटाचा फरक म्हणून पुन्हा ११८ रूपये प्रवाशांकडून घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
      प्रवाशांनी  फरक तिकीटाचे ११८ रूपये  नाही दिल्यास एसटीमधून खाली उतरवले जाते. त्यामुळे या बसमधून  प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये  संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तिकिटाचे ऑनलाईन बुकींग करतानाच पूर्ण रक्कम संगणकावर का दाखवली जात नाही, असा सवाल उपस्थित होतो. बुकींग करताना तिकीट  साध्या  बसचे अन् प्रवास करताना शिवशाही च्या जबरदस्तीच्या बसचे ! असा अजब प्रकार प्रवाशांना अनुभवावयास मिळत आहे.  जत तालुक्यातील प्रवाशांना याचा फटका बसत असून हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून चालू असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारची गंभीरपणे दखल घेऊन  चौकशी  करावी व दोषींवर करावी, अशी मागणी  विक्रम ढोणे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment