Thursday, September 20, 2018

जनावरांना चारा-पाणी द्या,अन्यथा बोंबाबोंब आंदोलन: बसवराज पाटील

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील पूर्व भागासह अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आहे,त्यात पाण्याच्या समस्येबरोबरच आता जनावरांना चारा टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपली जनावरे विक्रीस काढण्यास प्रारंभ केला आहे.  जनावरे वाचवण्याची गरज असून शासनाने त्वरीत चारा आणि उपलब्ध करून द्यावे, अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बसवसेनेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिला आहे.
जत तालुक्यातील संख, माडग्याळ, उमदी, बिळुर, डफळापूर, शेगाव व बनाळी  या भागातून मोठ्या प्रमाणात जनावरांची विक्री केली जात असल्याचेे चित्र पहावयास मिळत आहे. तीन महिने झाले, मान्सून पाऊस नाही. खरिप वाळून गेला आता पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.ऐन पावसाळ्याच्या दिवसांत उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे भूजल पातळीत घट झाली असून आताच ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भविष्यात उन्हाळ्यातील परिस्थिती चिंताजनक राहणार आहे.
     चारा आणि पाणी नसल्याने जनावरे अशक्त बनली आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिक व शेतकरी चार्‍याच्या शोधार्थ सांगली, मिरज,वाळवा तालुक्यातील पश्‍चिम भागात जात आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू  करण्याची मागणी बसवसेनेचे अध्यक्ष तथा सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी निवेदनाद्वारे सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
     चार्‍याला मागणी प्रचंड वाढल्याने दरातही वाढ झाली आहे. एक ट्राॕली चार्‍याला पंधरा ते वीस हजार रुपये दर घेत असल्यामुळे  शेतकर्‍यांसमोर जनावरांची विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. जनावराची मूळ किंमत लाखाच्या घरात असली तरी नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपले पशूधन कवडीमोल दराने विकावी लागत आहेत. त्यातीला बरीचशी जनावरे कर्नाटकातील कत्तल खान्याकडे जात असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
     बर्‍याचशा भागात उसाच्या वैरणीवर जनावरे अवलंबून असतात. मात्र ऊसतोडणी बंद होऊन अनेक महिने होत आल्याने आणखी परिस्थिती गंभीर बनली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास जनावरे दगावण्याची शक्यता आहे. सध्या असलेली दुष्काळी परिस्थिती आणि जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
   चारा टंचाई आणि पाण्याच्या समस्येमुळे दुग्धव्यवसायावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली असून अनेक दूधसंघाने ही बाब मान्य केली आहे. वारणा, राजारामबापू व अन्य दूध संकलन करणाऱ्या संस्थेकडे दररोज पुरवठा होणार्‍या दुधामध्ये घट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या  दूध संघानेही दुभती जनावरे वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. म्हणून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर जत तालुक्यातील जनावरांसाठी चारा आणि पाण्याची सोय करण्यात यावी. अन्यथा शेतकरी आपल्या जनावरांसह जत तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल,यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असा इशाराही बसवराज पाटील यांनी दिला आहे.

1 comment: