Saturday, September 29, 2018

बारावीचे अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबरपासून सुरुवात


जत,(प्रतिनिधी)-
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीचे अर्ज 1 ऑक्टोबरपासून भरता येणार आहेत. यंदा पहिल्यांदाचसरलया पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरले जाणार आहेत. यासाठी नियमित तसेच पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.  
     राज्य मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी राज्यातून साधारण 15 लाख विद्यार्थी बसतात. या परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखा मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी 1 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत नियमित शुल्कासह संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी यंदा प्रथमच सरल या डेटाबेसवरून अर्ज भरावयाचे आहेत तर, व्यावसायिक अभ्यासक्रमवाल्या विद्यार्थ्यांची यात नोंद नसल्याने त्यांनी प्रचलित पद्धतीनुसार अर्ज करायचे आहेत, असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान जे विद्यार्थी 21 नंतर अर्ज भरतील त्यांना विलंब शुल्क द्यावे लागणार आहे. विलंब शुल्क देऊन अर्ज करण्याची तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. बारावीचे हे अर्ज स्वीकारत असताना सरल डेटामध्ये या विद्यार्थ्यांची आधीपासूनच नोंद असणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment