Thursday, September 20, 2018

विविध आजारांच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यात फवारणी करा


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात स्वाइन फ्लूसह डेंगी,चिकनगुणिया आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जत तालुक्यातल्या गावांमध्ये आरोग्य विभागाने औषध फवारणी करण्याची, घर आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्याची तसेच घरोघरी जावून नागरिकांची चौकशी करून संशयित रूग्णांची त्वरित तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 जत तालुक्यातल्या गावांमध्ये बैठकांचे आयोजन करून आजार रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला आहे. मागील आठवड्यात सांगली जिल्ह्यातील सात जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. डेंगीपाठोपाठ स्वाइन फ्लूचा अचानक प्रादुर्भाव वाढल्यामुळे रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच डेंगी आणि मलेरिया या आजाराचा जिल्ह्याला मोठा विळखा बसलेला आहे. हा विळखा सोडविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसण्याची गरज आहे.
 जिल्ह्यात पथके नेमून संशयित रुग्णांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी विशेष मोहिम राबवण्याची गरज आहे. चिकनगुणिया, डेंगी किंवा मलेरियाचे रूग्ण आढळणार्या परिसरात औषध फवारणी करणे, त्याचबरोबर नागरिकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती कार्यक्रम राबवायला हवा आहे.
आरोग्य विभागाने पथकांच्या माध्यमातून गावातील संशयित रूग्णांची तपासणी करून पुढील उपचार तत्काळ सुरू करावे, औषधांचा पुरेशा साठा ठेवावा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि आधिकारी यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्याचीही मागणी होत आहे. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी अशी लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित जवळच्या शासकीय दवाखान्यात जावून उपचार घ्यावे, असे आवाहनही सामाजिक संस्थांकडून केले जात आहे.
स्वाइन फ्लू टाळण्यासाठी अशी घ्या काळजी:
1)वेळोवेळी स्वच्छ हात धुवा आणि पौष्टिक आहार घ्या 2) लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री आणि हिरव्या पालेभाज्या खा 3) पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या 4) शिंकताना, खोकताना नाक आणि तोंडावर रूमाल धरा 5) रूग्णाची सेवा कुटुंबातील एकाच व्यक्तीने करावी 6 घराबाहेर पडताना तोंडाला रूमाल बांधा.

No comments:

Post a Comment