Tuesday, September 18, 2018

सोळगेवस्ती व शिवारवस्तीचा पाणीप्रश्‍न मिटणार: सावंत


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन विक्रमदादा सावंत यांनी आवंढी (ता. जत) येथे विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी केले. म्हैसाळ पाणी योजना आणि तुरची-बबलेश्वर योजनेसाठी आपले प्रयत्नच सुरूच राहणार असल्याचेही यावेळी म्हणाले.
आवंढी येथील सोळगेवस्ती व शिवारवस्ती येथील पाणी टंचाई दूर व्हावी,यासाठी आमदार मोहनराव कदम यांच्या विकासनिधीतून दहा हजार लीटर टाकीच्या बांधकामासाठी अडीच लाखाचा निधी मंजूर झाला आहे. शिवाय ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून कुपनलिका आणि जलवाहिन्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे या वस्त्यांवरचा पाणीप्रश्न मिटणार आहे.महादेव काशीद यांनी पाण्याच्या टाकीसाठी जागा दिली आहे. रंजना सोळगे यांनी कुपनलिकेसाठी व सोळगेवस्ती येथील टाकीसाठी धनाजी सोळगे यांनी जागा दिली आहे.
यावेळी काँग्रेसच्या जिल्हा महासचिवपदी व दिनेश सोळगे, तालुका सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पं.. सभापती बाबासाहेब कोडग, सोलापूर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष डी.डी. कोळशे, सरपंच अण्णासाहेब कोडग, प्रदीप कोडग, अण्णासाहेब बाबर, संजय एडके, पार्वती कोडग, मुगाबाई कोडग, रत्नमाला कोडग, मनीषा कुंभार, मालन गेजगे, अनिल कोळी, संभाजी कोडग, संजय कोडग आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment