Monday, September 17, 2018

67 गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी द्या अन्यथा जनआंदोलन: अंकुश हुवाळे


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील 67 गावांना कर्नाटकातून पाणी आणण्याचे गाजर दाखवले जात आहे.पण या गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचेच पाणी मिळायला हवे अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश हुवाळे यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक नुकतीच खंडनाळ (ता.जत) येथे पार पडली. यावेळी बोलताना श्री. हुवाळे यांनी इशारा दिला. ते म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांपासून जत तालुक्याला म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्याचा प्रस्ताव आहे. पण यापूर्वीच्या सरकारांनी फक्त आश्वासन देण्याशिवाय काहीच केले नाही. म्हैसाळ योजनेचे पाणी जतच्या पश्चिम भागातील एका कोपर्यातून सोलापूर जिल्ह्यात जात आहे. वास्तविक सहावा टप्पा हा जतसाठी होता.पण राजकारण्यांनी त्याला छेद दिला आहे. म्हैसाळचे पाणी थेट उमदीपर्यंत यायला हवे.
श्री. हुवाळे पुढे म्हणाले, अलिकडे कर्नाटकातील तुरची-बबलेश्वर योजनेतून जतला पाणी आणण्याच्या बाता मारल्या जात आहेत.पण राजकारण्यांकडून फक्त गाजर दाखवण्याचे काम केले जात आहे. जतला म्हैसाळ योजनेतूनच पाणी मिळायला हवे अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी धानेश्वर माने, तम्मा कुलाळ, हरिश्चंद्र कांबळे, बिळणसिद्ध बिराजदार, मदगोंडा तोगलबगी, सोमनिंग भावी, प्रशांत बजबळकर, कृष्णा चव्हाण, तानाजी गेजगे, तानाजी पाटील, भारत टेंगले, डॉ. अमित पाटील यांच्यासह पूर्व भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment