जत,(प्रतिनिधी)-
दहा ते पंधरा गावांसाठी प्राथमिक आरोग्य
केंद्रे आणि तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालये अस्तित्वात आहेत. पण सर्पदंशाच्या लसी या ठिकाणी अभावानेच मिळतात.
यासाठी लोकांना शहरांकडे, खासगी दवाखान्यांकडे
धाव घ्यावी लागते. शिवाय लसींचा दर वाजवीपेक्षा जास्त असल्याने
गोरगरिबांना या लसी परवडत नाहीत. साहजिकच त्यांच्या जीवाला धोका
उत्पन्न होऊ शकतो. हे टाळण्यासाठी सर्पदंशावरच्या लसी सवलतीत
मिळायला हव्यात, अशी मागणी होत आहे.
भारतात दरवर्षी तीन लाख लोकांना सर्पदंश
होतो.वेळेत उपचार न मिळाल्याने 40 ते
50 हजार लोकांचा मृत्यू होतो. गेल्या वर्षी महाराष्ट्रात
राज्यात सर्वात जास्त म्हणजे 33 हजार 673 जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. वाढत्या सर्पदंशाच्या
घटना पाहता यावर तातडीने प्रभावी उपचार आणि समाजात जनजागृतीची आवश्यकता आहे.
खरे तर सर्प हा शेतकर्यांचा मित्र आहे,पण त्याच्या जाती ओळखण्यास गफलत केली जात असल्याने सापांना हकनाक आपला जीव
गमवावा लागत आहे.याचाही विचार होणे गरजेचे आहे. बिनविषारी साप फक्त भीतीमुळे मारले जातात. आणि आपणच पर्यावरणावर
संकट ओढवून घेतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार
दरवर्षी जगभरात पाच ते सहा लाख लोकांना सर्पदंश होतो. यापैकी 81 हजार ते एक लाख
38 हजार लोक सर्पदंशाने मृत्यूमुखी पडतात. चार
लाखांपेक्षा अधिक लोकांना कायमच शारीरिक आणि मानसिक अपंगत्व येतं. सर्पदंश प्रामुख्याने ग्रामीण, आदिवासी तरुण मजूर.
स्त्री-पुरुष व लहान मुलांना होतो. अनेक देशातील शासनव्यवस्था ही मलेरिया क्षयरोग, एड्स
या रोगांप्रमाणे सर्पदंशाकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे
सर्पदंशावरील उपचार स्वस्तात व्हायला हवे आहेत.
सर्पदंशाची लस दिल्याने अनेक रुग्ण बरे
होऊ शकतात. 21 व्या शतकामध्ये परिणामकारक आणि
सुरक्षित गुणवत्ता असलेली व अल्पदरातील लस गरज असेल तिथे उपलब्ध करता येणे गरजेचे आहे.
सर्पदंशामुळे लकवा, मेंदूतील रक्तस्त्राव अथवा
किडनी कायमस्वरुपी निकामी होऊ शकते. अशा प्रकारच्या घटनांमुळे
अनेकांना आपला हात व पाय काढावा लागतो, म्हणजेच गमवावा लागतो.
प्रयत्न करून दुर्लक्षित सर्पदंशावर चांगले उपचार झाल्यास लाखो रुग्णांचे
प्राण वाचू शकतात.
सर्पदंश झालेल्या रुग्णाला लवकरात लवकर
उपचार सुरू होणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण
भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात याची सज्जता असलायला हवी. औषधे-गोळ्या, लस उपलब्ध असायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांना साप हा नेहमीच धोकादायक वाटत आला आहे.
त्यामुळे दिसला साप की मार, असा प्रकार घडत आहे.
सर्पांविषयी लोकांना माहिती असायला हवी. यासाठी
जनजागृतीची गरज आहे.
सर्पदंश झाल्यावर घ्यावयाची काळजी
सर्पदंश झाल्यावर काही गोष्टींची काळजी
घ्यायलाच हवी. प्रथम जखम स्वच्छ पाण्याने धुवून
घ्यावी. व्यक्तीला धीर द्यायला हवा. पायी
चालणे किंवा जास्त बोलणे टाळावे. साप हाताला किंवा पायाला चावला
असेल तर चावलेल्या ठिकाणच्या वरच्या बाजूला दोरीने बांधून आवळून घ्यावे. व्यक्तीला चहा, कॉफी पाजू नये. दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये. त्यामुळे
जास्तीचा रक्तस्त्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. दवाखान्यात
जाण्यापूर्वी शक्यतो फोनवर रुग्ण घेऊन येत असल्याचे डॉक्टरांना कळवावे. जेणेकरून त्यांना तातडीने मदत करता येईल.
या गोष्टी टाळा
साप चावल्याने काही गोष्टी कटाक्षाने
टाळल्या पाहिजेत. सापाचे विष मंत्राने
उतरत नाही. दंश झालेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे न नेता तात्काळ
दवाखान्यात न्यावे. कडुलिंबाचा पाला, मिरची
खायला देऊ नका. सर्पदंश झालेल्या जागेवर कोणतीही औषधी वनस्पती
उगाळून लावू नका. कोणत्याही बिया वगैरे खायला देऊ नका.
No comments:
Post a Comment