जत,(प्रतिनिधी)-
अचकनहळ्ळी (ता.जत) येथील यमगर वस्तीवरील दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर नऊ दरोडेखोरांच्या टोळीने बुधवारी मध्यरात्री दरोडा घातला. यात दीड लाखाचा ऐवज लुटला. दरम्यान, दरोडेखोरांच्या हल्ल्यात शिंदे यांच्या घरातील पाचजण जखमी झाले. आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दरोडेखोरांनी सात तोळे सोन्याचे दागिने आणि चार हजारांची रोकड असा 1 लाख 61 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
दरोडेखोरांच्या हातात काठ्या, लोखंडी गज, दगड होते. त्यांनी दिलीप शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. त्यात दिलीप शिंदे, त्यांचे वडील तुकाराम, आई सिंधुताई, पत्नी शालन व मुलगा दत्तात्रय असे पाचजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जतमधील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अचकनहळ्ळी-वायफळे रस्त्यावर यमगरवस्तीच्या परिसरात शिंदे यांचे घर आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास शिंदे यांच्या आई सिंधुताई आवाजामुळे जाग्या झाल्या. चोरट्यांची चाहूल लागताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. दरोडेखोर घरात शिरताच शिंदे कुटुंबाने चोरट्यांचा प्रतिकार केला. त्यामुळे पंचवीस के तीस वयोगटातील नऊ दरोडेखोरांनी शिंदे कुटुंबातील महिलांसह सर्वांवर हल्ला केला. हल्ल्यात दिलीप यांचा पाय मोडला. वडील तुकाराम व सिंधुताई, पत्नी व मुलाला जबर मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर दरोडेखोरांनी सर्वांना दोरीने बांधून ठेवले.
या दरोड्यात सोन्याचे गंठण ,मोहनमाळ, सर ,कर्णफुले असे सहा तोळे तीन ग्रॅम सोने , चार हजार रुपयांची रोकड,एक मोबाईल असा एक लाख एकसष्ठ हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लूटून नेला. जत पोलिसांनी सांगली येथील श्वान पथकास पाचारण केले होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment