Sunday, September 30, 2018

रस्त्याच्या कारणावरून सोनलगीत हाणामारी


जत,(प्रतिनिधी)-
सोनलगी (ता.जत) येथे रस्त्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. या प्रकरणी उमदी पोलिसांत बारा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत उमदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोनलगी ते हळ्ळी ही पूर्वीपासून बैलगाडी वाट आहे. मात्र या परिसरातील जगताप कुटुंबियांनी ही वाट बंद करून त्याठिकाणी द्राक्षबाग लावली आहे. या परिसरात राहणार्या लोकांना दुसर्याच्या शेतातून वाट काढून देण्यात आली. परंतु,त्यांनीही वाट अडवल्याने या वाटेवरून जा-ये करण्यार्या लोकांची पंचाईत झाली आहे. त्यांना सोनलगी गावाला जाण्यासाठी दुसरीकडून वाट नाही. या परिसरात पन्नासभर लोकांची वस्ती आहे.
फिर्यादी नामदेव हंडेबार, बसवराज नडसे, तुकाराम कांबळे आदींनी कायदेशीररित्या जत तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली आहे. तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची समज जगताप कुटुंबियांना दिली होती. परंतु तरीही हा रस्ता मोकळा करण्यात आला नव्हता. शेवटी तहसीलदार यांच्या आदेशान्वये जेसीबी लावून रस्ता मोकळा करत असताना जगताप यांच्याकडील लोकांनी फिर्यादींवर हल्ला चढवला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अण्णाराया जगताप, पुंडलिक जगताप, केदारी जगताप, तुकाराम जगताप, संजू जगताप, मंजू जगताप, विलास जगताप, संतोष जगताप, मल्लाप्पा जगताप, अंबादास जगताप, मांतेश जगताप हे सर्व पसार झाले आहेत.




No comments:

Post a Comment