जत,(प्रतिनिधी)-
खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने आणि रब्बी हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी शेवटी गाढवाचेही पाय धरले आणि त्याचे लग्नही लावून दिले. वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी आता शेतकऱ्यांना गाढवाचाही आधार घ्यावा लागल्याने जत परिसरात हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
जतमधील विठ्ठलनगर शेतकऱ्यांनी एकत्रित हा विवाह घडवून आणला आणि नंतर या विवाहित गाढवांची सवाद्य मिरवणूक जत शहरातून काढली.
विशेष म्हणजे लग्न लावण्यासाठी गाढवे उपलब्ध झाली नसल्याने आसंगी ( जत ) येथील गाढवांची जोडी भाड्याने आणण्यात आली होती. तर वाजंत्री खलाटी ( ता.जत ) येथून आले होते.सुरवातीला गाढवाना सजवून विठ्ठलनगर येथे त्यांचे थाटामाटात लग्न लावण्यात आले. यावेळी विठ्ठलनगर, वसंतनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लग्न लावल्यानंतर गाढवांच्या जोडीची जत शहरातील निगडी कॉर्नर, महाराणा प्रताप चौक , जयहिंद चौक , गांधी चौक, वाचनालय चौक व थोरलीवेस येथून मिरवणूक काढण्यात आली.जत गावकामगार पोलीस पाटील मदन मानेपाटील यांच्या हस्ते गाढवांची पूजा करून पावसासाठी वरुण राजाला साकडे घालण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पापा सनदी , रमेश माळी, दत्ता कांबळे, मिलिंद शिंदे, बाळू कांबळे, दादासाहेब कांबळे , सदा कांबळे , अंबादास माळी , चिवडाप्पा चौगुले, मुऱ्याप्पा माने, संतोष माने, राम पवार , रविंद्र कांबळे , यल्लाप्पा बामणे , सुनील सुर्यवंशी, अनिल डोंबाळे, महेश तंगडी, ज्योत्याप्पा बेळुंखी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment