Thursday, September 20, 2018

व्हसपेठ ते चडचण रस्ता रुंदीकरणाचे काम निकृष्ट


जत,(प्रतिनिधी)-
जत-चडचण या राज्यमार्ग क्रमांक 155 वर व्हसपेठ ते चडचण हद्दीपर्यंत रस्ता रुंदीकरण व सुधारणा करण्याचे काम चालू असून हा रस्ता रुंदीकरण करताना येथील अधिकार्यांच्या संगनमताने ठेकेदाराने दोन्ही बाजूला खडीमध्ये चक्क माती टाकून दर्जाहीन काम सुरू केले आहे. या कामाची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
 चडचण हद्दीपासून ते व्हसपेठ डोंगरापर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साडेसोळा कोटीचे काम मंजूर आहे. या मंजूर रस्त्याचे संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू आहे. रस्ता रुंदवणे व डांबरीकरण करणे असे या कामाचे स्वरूप आहे. चडचण हद्दीपासून ते सोन्याळजवळील नदाफ फाट्यापर्यंत रस्ता रुंदवण्याचे कांम अंतिम टप्प्यात आहे. कामाची गुणवत्ता राखणे अपेक्षित होते. परंतु दर्जा सुमार आहे. हा रस्ता रुंदवताना दोन्ही बाजूला खोली व रुंदीत फरक करण्यात येत आहे. रुंदावलेल्या खड्ड्यात प्रमाणात खडी व खडीबरोबर उत्तम प्रतीचे मुरूम टाकणे आवश्यक असताना रस्त्याकडेची माती गोळा करून तर काही ठिकाणी चर खोदून चक्क माती टाकण्यात येत आहे. खडीमध्ये माती मिसळून व जुजबी पद्धतीने पाणी मारून रोलर फिरवले जात आहे. लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
जत-उमदी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. रस्ता पूर्ण नादुरुस्त व खड्डेमय झाला आहे. हा रस्ता 52 किलोमीटरचा आहे. गेल्यावर्षी या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र त्यावेळेसही बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम निकृष्ट असल्याने रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे. साडेसोळा कोटींच्या रस्त्याचे काम काही किलोमीटर अंतिम टप्प्यात आले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इस्टिमेटप्रमाणे कामे होत नसल्याने हा रस्ता निकृष्ट चालल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी सोन्याळ, उटगी, उमदी, माडग्याळ, जाडरबोबलादसह येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.

No comments:

Post a Comment