Friday, September 21, 2018

शाळांना पुरवण्यात येणारा धान्यादी माल निकृष्ट


मापात पाप;पुरवठा ठेकेदारावर कारवाईची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उंटवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला पुरवण्यात आलेला तांदूळ आणि धान्यादी माल अत्यंत निकृष्ट असल्याचे तसेच मापात पाप होत असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीने जि.. शिक्षण सभापती तम्मणगौडा पाटील यांच्याकडे केली होती. त्यामुळे त्यांनी शाळेला भेट देऊन तांदूळ आणि मालाची पाहणी केली. यात तथ्य आढळून आले असून ठेकेदारावर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेत चर्चा केली जाईल, असे श्री.पाटील म्हणाले.
 राज्य शासनाच्या शालेय विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार्या पोषण आहाराच्या मापात पाप असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. मात्र पुरवठा ठेकेदार त्याकडे लक्ष देत नाहीत. शाळांना तांदूळ आणि धान्यादी माल ताब्यात घेतला नाही तर आहार शिजवणे अवघड जाते व मुले आहारापासून वंचित राहतात. त्यामुळे शिक्षकदेखील कमी माल असला तरी स्वीकारतात. मात्र याचा गैरफायदा ठेकेदार,पुरवठादार घेत आहेत. याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. वास्तविक शाळांनी अशा कमी मालाचा व निकृष्ट धान्याचा लगेच पंचनामा करून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यायला हवा. त्यामुळेच हे पुरवठादार वठणीवर येणार आहेत.
उंटवाडी येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी याची तक्रार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगौङा रवी पाटील यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन दोन दिवसांपूर्वी त्यांनी उंटवाडी येथे भेट देऊन संपूर्ण पोषण आहाराची पाहणी केली. पोषण आहारात मापात पाप असून हा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे त्यांनी सांगितले. जत तालुक्यातील उंटवाडी या जिल्हा परिषद मराठी शाळेसह तालुक्यातील अनेक शाळेत पोषण आहारात मापात पाप असून कमी वजनाचा शालेय पोषण आहार देण्यात येतो. या पोषण आहारात तांदूळ, डाळी आदी निकृष्ट दर्जाचा असल्याची दखल घेऊन रवी पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली. वजनामध्ये पन्नास किलोऐवजी 45 किलो शालेय पोषण आहार (तांदूळ) दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे शिक्षकांना अवघड झाले असून पोषण आहारही निकृष्ट दर्जाचा आहे. उंटवाडीतील शाळेत निकृष्ट दर्जाचा व शालेय पोषण आहार पाहून सभापतीही अवाक झाले. याबाबत त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे. मापात पाप करणार्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री. खोत यांनी केली.

1 comment:

  1. जर मापात पाप असेल तर जरूर कारवाई व्हावी. पण सभापती ह्यांनी शाळेला भेट दिलीच नाही. त्यांनी भेट दिली असती तर अन्य गोष्टी पण समोर आल्या असत्या. सध्या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. इमारत कधी ढासळेल सांगता येत नाही. शिक्षक व विध्यार्थी जीव मुठीत धरून हा शिक्षणाचा गाडा हाकत आहेत.४०-५० मुलांना गालफुगीची लागण झाली आहे. हेच सभापती आरोग्य विभागाचं काम पाहतात. यांना या गोष्टी दिसल्या नसतील तर नवल. बातमी देणाऱ्या सन्माननीय पत्रकारास विनंती आहे की त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वृत्तांकन करावं.

    ReplyDelete