Wednesday, September 12, 2018

शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांना सीईओंची शिस्तभंगाची नोटीस?


शिक्षक बँक सभा हाणामारी प्रकरण;एक शिक्षक निलंबित
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घालण्याबरोबरच हाणामारी करून शिक्षकी पेशाला काळिमा लावणार्या शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी जोरदार झटका दिला आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, शिक्षक बँकेचे संचालक शशिकांत बजबळे, उत्तम जाधव, सदाशिव पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. तर नारायण कदम (आटपाडी) या शिक्षकाला निलंबित केले आहे.
परवा रविवारी झालेल्या सांगली जिल्हा शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्येच जोरदार हाणामारी झाली होती. खुर्च्यांची फेकाफेक करत मोठा गोंधळ घातला होता. एकमेकांच्या उरावर बसून हाणामारी करत असल्याच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. यामुळे शिक्षकांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. शिक्षकी पेशाला काळिमा लावणारी घटना म्हणून या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षकांसह समाज माध्यमातून होत होती.शिक्षकांना पगार जादा झाला आहे, असले शिक्षक मुलांना काय शिकवणार? शिक्षक बँकेवर प्रशासक नेमा,बँकेची खातेनिहाय चौकशी करा, अशा अनेक मागण्या होऊ लागल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.
प्राथमिक शिक्षक बँकेचे सभासद हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. त्यामुळे या बँकेतील सभेतील हाणामारीची दखल मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली. अहवाल मागवून पहिल्यांदा मारामारी प्रकरणात पुढे असलेल्या नारायण कदम या शिक्षकाला निलंबित केले. शिवाय शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांना शिस्तभंगाची नोटीस प्रस्तावित केली आहे. याशिवाय पोलिस तपासात आणखी काही शिक्षकांची नावे उघड झाल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा पवित्रा मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला आहे. दरम्यान,पोलिसांत परस्पर विरोधात तक्रार दाखल झाल्याने पोलिस त्याचा तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment