Friday, September 14, 2018

उमराणी येथील प्रतापराव गुजर यांचे स्मारक आणि विजयस्तंभ दुर्लक्षित


सुशोभिकरण व बगीचा उभारण्याची गरज
जत,(मच्छिंद्र ऐनापुरे)-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासातील उमराणी (ता.जत) येथील दैदिप्यमान अशा रणसंग्रामाला मोठे महत्त्व आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी त्यांच्या उत्तम युद्धनीतीचा परिचय देत प्रचंड संख्येने स्वराज्यावर चालून येणार्या विजापूरच्या आदिलशाच्या सरदाराचा बेहलोलखानचा दारूण पराभव केला होता. या इतिहासाची साक्ष सांगणार्या उमराणीतल्या प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाची आणि विजयीस्तंभाची मोठी दुरवस्था झाली आहे. दुर्लक्षित स्मारक अस्तित्वहिन बनले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी  1673 मध्ये आदिलशहाकडून पन्हाळागड जिंकला होता. संतापलेल्या आदिलशहाने प्रचंड फौजेसह त्याचा सरदार बेहलोलखानाला पन्हाळगडाच्या मोहिमेवर पाठवले होते. तो येत असल्याचे शिवाजी महाराजांना कळल्यावर त्याला वाटेतच रोखण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना सैन्यांनिशी मोहिमेवर पाठवले. प्रतापराव गुजर आणि बेहलोलखान यांच्या सैन्यांची गाठ उमराणीजवळ पडली. इथे तुंबख युद्ध झाले. यात गुजरांनी मोठा प्राक्रम दाखवला. साहजिकच प्रचंड सैन्य घेऊन आलेल्या बेहलोलखानचा दारूण पराभव झाला. स्वराज्यावर चालून येणार्या आदिलशहाच्या सरदाराला म्हणजेच बेहलोलखानला वाटेतच रोखण्यासाठी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मोहिमेवर पाठवले होते. ही घटना 1673 सालातील आहे. यावेळी जत  (जि.सांगली)संस्थानाजवळील उमराणी गावाजवळ सरसेनापती प्रतापराव गुजर आणि बेहलोलखान यांच्या सैन्याची गाठ पडली. गुजर यांनी आपल्या उत्तम युद्धनीतीचा अवलंब करीत प्रचंड सैन्य घेऊन आलेल्या आदिलशहाच्या सरदाराचा दारूण पराभव केला होता. याठिकाणी बेहलोलखान शरण आला आणि प्रतापराव गुजर यांच्यापुढे गुडघे टेकून आपल्या प्राणाची क्षमायाचना केली. प्रतापरावांनी त्याच्यावर दया दाखवून सोडून दिले. मात्र हाच खान पुन्हा 1674 मध्ये चाल करून आला. यावेळी प्रतापराव पश्चाताप झाला. बेहलोलखानचा कायमचाच बंदोबस्त करायचा अशा इराद्याने पेटून उठलेल्या प्रतापराव आणि बेहलोलखानच्या सैन्याची गाठ नेसरी ( ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) येथे पडली. त्वेषाने पेटून उठलेल्या प्रतापरावांनी फक्त सहा साथीदारांसोबत चाल करून गेले होते. याठिकाणी झालेल्या युद्धात प्रतापराव आणि त्यांचे सहाही साथीदार धारातीर्थी पडले.
नेसरी येथे प्रातपराव गुजर यांचे भव्य असे स्मारक उभारण्यात आले आहे. पण ज्याठिकाणी आदिलशहाच्या प्रचंड सैन्याचा पराभव केला होता, तिथला इतिहास मात्र उपेक्षितच राहिला आहे. कारण या ठिकाणी बांधण्यात आलेले प्रतापराव गुजर यांचे स्मारक आणि विजयीस्तंभ यांची मोठी दुरवस्था झाली आहे. खरे तर मराठेशाहीच्या इतिहासातील उमराणीचा रणसंग्राम हा अत्यंत दैदिप्यमान ठरला आहे. हा विजयी इतिहास जपण्यासाठी 2002 मध्ये सांगली जिल्हा परिषदेने उमराणी येथे प्रतापराव गुजर यांचे स्मारक आणि विजयीस्तंभ उभारण्याचा संकल्प केला. आज हे स्मारक आणि विजयीस्तंभ उभारण्यात आले असले तरी त्याची दुरवस्था पाहिल्यावर खरेच याठिकाणी दैदिप्यमान रणसंग्राम घडला होता का, असा प्रश्न पडतो.

अत्यंत तोकड्या निधीत या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आली होती. सुमारे चाळीस लाख रुपये खर्च करण्यात आला असला तरी हा निधी अत्यंत तोकडा आहे. शिवाय त्यानंतर यासाठी कसलीही तरतूद करण्यात आली नसल्याने हे स्मारक दुर्लक्षीतच राहिले आहे. बांधकाम साध्या पद्धतीचे आहे. हा ऐतिहासिक ऐवज वाटत नाही. सोळा वर्षात काहीच प्रयत्न अथवा सुधारणा झाली नसल्याने हे स्मारक अक्षरश: अडगळीत पडले आहे. हे स्मारक नेमके कशाचे आहे, हेही कळत नाही. कारण याठिकाणी साधा फलकही उभारण्यात आलेला नाही. स्मारक परिसरात कुसळे उगवली आहेत. प्रवेशद्वार कायम बंद असते.पर्यटन केंद्र म्हणून विकसित करता आले असते. विजयपूरला ऐतिहासिक स्थळे पाहायला जाणार्यांना हे स्थळ महत्त्वाचे ठरू शकले असते.पण सुशिभिकरण अथवा बगीचा यांचा अभाव असल्याने याचे महत्त्वच कमी झाले आहे. जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन स्मारकाची झालेली दुरवस्था दूर करावी आणि त्याला एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशी मागणी होत आहे.





No comments:

Post a Comment