Sunday, September 9, 2018

अभ्यासक्रमाचा स्तर सीबीएसईच्या धर्तीवर


दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात होणार बदल

जत,(प्रतिनिधी)-
अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने अभ्यासक्रम बदलाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणार्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि बारावीच्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात बदल करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डातील सूत्रांनी दिली आहे.
     बालभारतीच्या विविध विषयांच्या अभ्यासमंडळाच्यावतीने यंदा दहावीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार बालभारतीच्या विषयतज्ज्ञांनी नव्या बदलाच्या माध्यमातून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या स्तराचा करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेईई व नीट आदींसारख्या परीक्षांची वेगळी तयारी करावी लागणार नाही. गेल्या काही वर्षांत राज्य मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली असून सीबीएसईकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी मंडळाकडून अशा प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचेदेखील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
या मूल्यमापन आराखड्यानुसारच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्यात येणार आहे. याची शिक्षकांना माहिती देण्यासाठी शिक्षण मंडळाच्यावतीने सप्टेंबर महिन्यात विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत राज्यभरातील ठरावीक शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची ही नवी पद्धत वर्तमान पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. विशेषत्वाने भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न वेगळे असतील. मिळालेल्या माहितीनुसार नवीन पद्धतीत कृतिपत्रिकेवर आधारित प्रश्नांचा भर राहणार असून उपयोजनात्मक प्रश्नांवर भर देण्यात येणार आहे. हे प्रश्न तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यास व लेखनकौशल्याचे आकलन केले जाणार आहे.
इयत्ता दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसारच कृतिपत्रिकांवर आधारित प्रश्नपत्रिका असणार आहेत. बदललेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षकांना विद्या प्राधिकरणाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच इयत्ता बारावीच्या भाषा विषयांसाठीदेखील कृतिपत्रिका लागू करण्यात आल्यामुळे या विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातदेखील बदल करण्यात येणार आहेत.


No comments:

Post a Comment