Sunday, September 9, 2018

अंगणवाडी केंद्रातून किशोरी मुलींना देण्यात येणारा आहार बंद

जत,(प्रतिनिधी)-
 ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी असलेली गरम ताजा व सकस आहार पुरवठा करण्याची योजना केंद्रातील मोदी सरकारने गुंडाळली असून अंगणवाडी केंद्रातून किशोरी मुलींना होत असलेला आहार पुरवठा 1 सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त इंद्रा माला यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकार्यांना किशोरी मुलींना सुरू असलेला आहार पुरवठा बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.
     किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना किशोरी शक्ती योजनेतून गरम ताजा आणि सकस आहार देण्यात येत होता. याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर होती. अंगणवाडी केंद्रात येणार्या बालकांबरोबरच किशोरवयीन मुलींसाठीही सकस आहार तयार करण्यात येत होता. दररोज हा आहार किशोरवयीन मुलींना देण्यात येत होता. परंतु केंद्र सरकारने अचानकच ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना बंद झाल्याने किशोरवयीन मुलींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
     मुलींसाठी बनविण्यात येत असलेल्या आहाराकरिता अनुदान मिळणार नसल्याने राज्य सरकारनेही आपले हात झटकले आहेत. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने 1 सप्टेंबरपासून आहार पुरवठाच करू नका, असा आदेश काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोदी सरकारच्या योजना बंद करण्याच्या या निर्णयाचा ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फटका बसणार आहे. या निर्णयाबाबत किशोरी मुलींच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत विरोधी पक्षांनी आवाज उठविण्याची अपेक्षाही पालकांतून व्यक्त  होत आहे.

No comments:

Post a Comment