Saturday, September 15, 2018

आधारभूत किंमतीसाठी उडीद,मका, मूग खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यासह जिल्ह्यात मका, उडीद, मूग आदींचे उत्पादन सुरू झाले आहे. मात्र शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. मका.उडीद,मुगाला आधारभूत किंमत मिळावी,यासाठी शासनाने जत आणि सांगली येथे खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे. 
शासनाने पिकांच्या कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. शेतकर्यांच्या शेतीमालांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याचबरोबर शेतकर्यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देण्याचे काम केले जाते. परंतु शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात मका,मूग,उडीद, यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या त्याचे उत्पादन सुरू आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी शासनाने उडीदसाठी 5 हजार 600 रुपयांचा हमीभाव निश्चित केला आहे. यंदा तरी उडदाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकर्यांची अपेक्षा होती. परंतु, सध्या क्विंटलला 3 हजार 500 ते चार हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
मका 1700 रुपये हमी असताना 1550 ते 1600 रुपये भाव मिळ्अत आहे. मुगाची आधारभूत किंमत 6 हजार 975 रुपये असताना बाजारात 4 हजार 800 ते 5 हजार 200 रुपये भाव मिळत आहे. उडीद,मका आणि मुगाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने खरेदी केंद्र सुरू केले तर शेतकर्यांना हमीभाव मिळेल. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्वरीत लक्ष घालून सांगली मार्केट यार्ड आणि जत येथे खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment