जत,(प्रतिनिधी)-
दसरा जसजसा जवळ येतोय, तसतशी ऊसतोड कामगारांची साखर कारखान्याला जायची लगबग सुरु होते. यावर्षी मात्र हे ऊसतोड कामगार मागच्या 24 दिवसांपासून
संपावर आहेत. तरीही या कामगारांच्या मागण्यांसंदर्भात चर्चेच्या
कोणत्याही हालचाली पाहायाला मिळत नाहीत. एकीकडे यावर्षी भरपूर
ऊस शेतात उभा असताना, ऊसतोड कामगार मात्र हाती कोयता घ्यायला
तयार नाहीत, म्हणून मोठा पेच निर्माण झाला आहे. या कामगारांच्या मागण्यांकडे शासन आणि कारखानदार लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आपले बिर्हाड पाठीवर घेऊन
वर्षातील सहा महिन्यांपेक्षा जास्त काल भटकंती करणारा समाज म्हणजे ऊसतोड कामगार.
ऊन, वारा, पाऊस याची तमा
न बाळगता ऊसाच्या फडात राब राब राबणार्या या हाताच्या कामातून
साखर गोड होते खरी, मात्र या ऊसतोड कामगारांचा संघर्ष कायम चालू
असतो. एकीकडे शासन हार्वेस्टरने ऊसतोडणी करताना टनभर ऊस तोडायला
पाचशे रुपयाच्या जवळपास खर्च करते. मजुरांना मात्र तोडणी करायला
228 रुपये टनाला देतात. म्हणून शंभर टक्के दरवाढीची
मागणी कामगारांनी केली आहे.
संपूर्ण
राज्यभरात 12 ते 13 लाख ऊसतोडणी मजूर आहेत.
त्यात सर्वाधिक ऊसतोडणी मजुरांची संख्या बीड, सोलापूर,
सांगली जिल्ह्यात आहेत. याशिवाय नगर, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद,
जळगाव, धुळे, नंदुरबार भागात
मजुरांची संख्या अधिक आहे. मुळात ज्या पद्धतीने ऊसतोड कामगारांना
काम करावे लागते, त्या तुलनेत कष्टाचा मोबदला मिळत नाही.
त्यामुळे ऊसतोड कामगारांसोबतच ऊस तोडणी मुकादमास 18.5 टक्के कमिशन आहे, ते 35 टक्के करावे,
अशी मागणी या आंदोलांकर्त्यांची आहे.
ऊसतोड
कामगार मुकादम संघटनांनी ऊस तोडणी कामगारांचा संप हा 19 ऑगस्टपासून
पुकारला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार
यांच्या दोघांचा लवाद ऊसतोड कामगरासाठी होता. गोपीनाथ मुंडेंच्या
आकाली निधनानंतर पंकजा मुंडे आणि जयंत पाटील यांची या लवादावर निवड करण्यात आली.
नुकतीच या लवादाची एक बैठक पुण्यात पार पडली. या
पूर्वी 2015 साली ऊसतोड कामगारांनी संप केला होता. मात्र त्यावेळी दुष्काळाचे दिवस असल्याने आणि ऊसाचे प्रमाण कमी असल्याने ऊसतोड
कामगारांनी तडजोड करुन संप मागे घेतला होता. यावर्षी एकतर ऊसाची
उपलब्धताही विक्रमी आहे आणि त्यामुळे यावर्षी साखर कारखान्यांचा हंगाम वाढणार आहे.
म्हणूनच वेळेत साखर कारखाने सुरु कारायचे असल्यास ऊसतोड कामगाराच्या
संपावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे.
अशा आहेत ऊसतोड कामगारांच्या मागण्या
1) साल 2014-15 साठी अंतरिम
दरवाढीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याची अंमलबजाणी करावी.
2) ऊस तोडणी दरात 100 टक्के
वाढ करावी.
3) 35 टक्के कमिशन मुकादमास द्यावे सध्या ते18.5
टक्के आहे. - कारखाना साईटवर ऊसतोड मजूर व बैलांसाठी
वैद्यकीय सेवा उपलब्ध कराव्यात.
4) 15 रुपये प्रत्येक दिवशी बैलगाडीच्या टायर गाडीचे
भाडे घेण्यात यावे.
5) 30 रुपये प्रत्येक दिवशी ट्रॅक्टर गाडीचे भाडे
घ्यावे.
6) ऊस तोडणी मजुरांचा जीवन विमा साखर कारखान्यांनी
भरावा.
7) 60 वर्षांच्या पुढील ऊसतोड मजूर मुकादमास पेन्शन
मिळावी.
8) ऊसतोड मजुरांच्या मुलाकरता प्रत्येक तालुक्यात
निवासी शाळा आणि वस्तीगृहाची सोय करण्यात यावी
No comments:
Post a Comment