Sunday, September 16, 2018

जत पूर्व भागातील गावांना पाणी मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा!


जत,(प्रतिनिधी)-
काँग्रेसचे नेते,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य आणि आगामी विधानसभेचे काँग्रेसकडील उमेदवारीचे प्रबळ दावेदार विक्रमदादा सावंत यांनी जत तालुक्यातील 68 गावांतील पाणीप्रश्नासाठी नुकतीच केंद्रीय जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. जतच्या पूर्वभागातील या गावांना कर्नाटकातून पाणी देणे स्वस्तात आणि सोयीचे ठरत असल्याने अलिकडच्या काही वर्षात काँग्रेस आणि भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.याबाबत दोन्हीकडील राज्यातील अधिकारी आणि मंत्रिपातळीवर बैठकाही पार पडल्या आहेत,मात्र पाणी वाटपाबाबत पुढे काही हालचाली झालेल्या नाहीत.यामध्ये केंद्रसरकारचा हस्तक्षेप झाल्यास जतला लवकरात लवकर कर्नाटकातून पाणी मिळणे सुलभ होणार आहे. यासाठी दोन्ही राज्यातील सरकारे आणि केंद्र सरकार यांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. शिवाय नेटाने आणि सातत्याने पाठपुरावा करणेही महत्त्वाचे आहे.

मागच्या कर्नाटकच्या सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या तुरची-बबलेश्वर या पाणी योजनेच्या माध्यमातून जत तालुक्यातल्या 68 गावांना पाणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. विक्रमदादा सावंत यांच्याबरोबरच जतचे आमदार विलासराव जगताप यांनीदेखील कर्नाटकातील संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या अडचणीच्यावेळी बर्याचदा पाणी दिले आहे. त्यामुळे तत्कालिन सत्तेतील लोकांनी यासाठी हात आखडता घेतला नाही. जवळपास यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. मात्र पुढच्या बैठका रेंगाळल्या. त्यातच कर्नाटकात निवडणुका लागल्या. काँग्रेसच्या पाठिंब्यावर जनता दलाचे कुमारस्वामी यांचे सरकार आले असले तरी त्यांना अजून बस्तान बसवायलाच वेळ लागत आहे. साहजिकच त्यांचे जतच्या पाणीपुरवठ्याकडे लक्ष असण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरीदेखील जतच्या लोकांकडून पाठपुरावा सुरू आहे, हे महत्त्वाचे आहे.
कर्नाटकात सत्ता बदल झाला असल्याने आता पुन्हा नव्याने बोलणी करण्याची आवश्यकता आहे.यासाठी महाराष्ट्र सरकार, जतचे आमदार विलासराव जगताप आणि विरोधक म्हणजे काँग्रेस या मंडळींनी पाण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सततचा पाठपुरावाच यासाठी फायद्याचा ठरणार आहे. विक्रमदादा सावंत यांनी याची चांगली सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजपकडून याला गती मिळण्याची आवश्यकता आहे. सतत दुष्काळी,वंचित जीवन जगलेल्या जत तालुक्यातल्या शेतकर्यांना कृष्णेच्या पाण्याची आस लागली आहे. मिरजेतून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावांना पाणी मिळाले आहे. त्यामुळे पाण्याची वाट पाहात दोन पिढ्या गेलेल्या तालुक्यातल्या सध्याच्या पिढीच्या मात्र आशा पल्लवित झाल्या आहेत.
कृष्णेचे पाणी पश्चिम भागात खळाळणार असले तरी पूर्व भाग मात्र तसाच कोरडा राहणार आहे. पण कर्नाटकची तुरची-बबलेश्वर ही उपसा योजना जतच्या अगदी जवळ येत असल्याने आणि त्यातून जतला फारसा खर्च न करता सायपन पद्धतीने पाणी पुरवठा होऊ शकणार असल्याने कर्नाटकातून पाणी आणण्याचा जोर अलिकडच्या काळात वाढला आहे. हिरेपसलडगी योजनेतून जत तालुक्यातल्या पूर्व भागातील गावांना पाणी देता येणे शक्य आहे. सुरुवातीला म्हणजे 2013 मध्ये 42 गावांना तांत्रिकदृष्ट्या पाणी कसे देता येईल,याचा अहवाल तयार केला गेला. तो शासनाकडे सादर करण्यात आला. शासनाने त्यास मंजूरी दिली. त्यानुसार तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कामासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले. आता या योजनेत आणखी काही गावांची भर घालून ही संख्या आता 68 झाली आहे.
गेल्याचवर्षी सांगलीतल्या पाटबंधारे विभागात कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील पाटबंधारे विभागातील अधिकार्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन जतला पाणी लवकरच देण्याबाबतचा निर्णय झाला. मात्र सरकारी पातळीवर पुन्हा याबाबत कुठल्याच हालचाली झाल्या नाहीत. आता तर कर्नाटकमध्ये नवे सरकार स्थापन झाले आहे. सरकारबाबत रोज नवनव्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. कुमारस्वामी यांचे सरकार राहणार की जाणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र तरीही महाराष्ट्र सरकारकडून बोलणी चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पूर्वी याबाबत बोलणी झाली असल्याने पुन्हा फारसे प्रायास करावे लागणार नाहीत. यात केंद्र सरकारला मध्यस्थी स्वरुपात घेतल्यास यावर लवकर तोडगा काढता येईल.
जत तालुक्यातील पूर्व भागातील 68 गावांचे अंदाजे क्षेत्र 82 हजार 14 हेक्टर इतके आहे. जर योजना सुरू झाली तर सुमारे 35 ते 40 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.त्यामुळे महत्त्वाचे म्हणजे शेतकर्यांना शाश्वत पाणी मिळेल. महाराष्ट्र सरकारकडून कर्नाटकला उन्हाळ्यात गेल्या तीन वर्षांपासून मोफत पाणी दिले जात आहे. 2015-16 मध्ये 1 टीएमसी, तर 2016-17 आणि 2017-18 मध्ये दोन-दोन टीएमसी पाणी देण्यात आले आहे. या बदल्यात जत तालुक्यातील ओढे,तलाव भरून मिळावेत, अशी मागणी आहे. शिवाय यासाठी पाणी उपसा करण्यासाठी पंप वगैरेची गरज नाही. जत तालुक्यातल्या या गावांना पाणी देणे अगदी स्वस्तात आणि सोयीचे ठरणार आहे.



No comments:

Post a Comment