Saturday, September 8, 2018

आवंढीमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार


आवंढीमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आवंढी गावातल्या महिला गावात दारूबंदी व्हावी,यासाठी पुढे सरसावल्या आहेत. 10 सप्टेंबरपूर्वी गावात दारूबंदी झाली नाही तर दारूबंदी व उत्पादन शुल्कच्या जत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा गावातल्या महिलांनी दिला आहे.
पानी फौंडेशनच्या कामात भरीव काम करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील प्रभाव टाकणार्या या गावातल्या महिला आता गावात दारूबंदी व्हावी,यासाठी पुढे सरसावल्या आहेत. दारूमुळे या गावातील अनेक कुटुंबे उदवस्त झाली आहेत. अनेक कुटुंबे उद्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. महिलांना काही भागातून एकट्याने जाणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे, अशा परिस्थितीत संतापलेल्या महिलांनी गावात दारूबंदी व्हावी,यासाठी चंगच बांधला आहे. गावातील दारू अड्डे बंद व्हावेत,यासाठी काल गावातल्या महिलांनी थेट जतचे पोलिस ठाणे गाठले होते. या पोलिसांनी दारूबंदी व उत्पादन शुल्कच्या कार्यालयाकडे जाण्याचा सल्ला दिला. महिलांनी या कार्यालयाबाहेर गर्दी करून गावात दारूबंदी करण्याची मागणी केली.
दरम्यान, उत्पादन शुल्कचे अधिकारी एम.व्ही. शेंडे यांनी त्यांना आश्वासन दिले आहे. मात्र 10 सप्टेंबरपर्यंत गावात दारूबंदी झाली नाही तर कार्यालयापुढे उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदी समितीच्या अध्यक्षा संगीता दिलीप कोडग, उपाध्यक्षा रत्नमाला शामराव कोडग, सचिव प्रतिभा तानाजी कोडग, सहसचिव अर्चना सुधाकर कोडग, कांचन सुभाष कोडग या म्हणाल्या की, 24 ऑगस्टच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला आहे,परंतु आजपावेतो गावात दारूबंदी झाली नाही नाही. त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावर उतरावे लागले आहे. आता गावात दारूबंदी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.



No comments:

Post a Comment