Friday, September 14, 2018

जत पूर्व भागातील 68 गावांसाठी विक्रम सावंत नितीन गडकरींना भेटले

(काँग्रेसचे जत तालुक्याचे नेते विक्रमदादा सावंत यांनी जत तालुक्यातल्या 68 गावांच्या पाणी प्रश्नांसाठी दिल्लीत जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.सोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार होते.)


कर्नाटकातून जत पाणी द्या;केंद्राने पुढाकार घ्यावा
जत,(प्रतिनिधी)-
जतच्या पूर्वभागातील 68 गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून या भागातील गावांसाठी तुरची-बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून कर्नाटकातून जतला पाणी आणणे सोयीचे ठरणार असल्याने काँग्रेसचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय जलसंधारण व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.यावेळी याबाबत सकारात्मक सविस्तर अशी चर्चा झाल्याचे विक्रम सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेली अनेक वर्षे जत तालुका दुष्काळाने होरपळत आहे. जतच्या पश्चिम भागात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कृष्णेचे पाणी येत आहे. परंतु, या पाण्यापासून तालुक्याच्या पूर्वभागातील 68 गावे वंचित राहणार आहेत. या गावांना कर्नाटकातून पाणी आणणे सोयीस्कर ठरणार आहे. कर्नाटक शासनाने राबवलेली तुरची-बबलेश्वर या पाणी योजनेच्या माध्यमातून फारसा आर्थिक फटका न बसता जत तालुक्याला पाणी येऊ शकते. अगदी नैसर्गिक पद्धतीने जत तालुक्यात हे पाणी येऊ शकते. केंद्राने यासाठी पुढाकार घेतल्यास ही योजना लवकर मार्गी लागू शकते. यासाठी विक्रम सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांनी नुकतीच केंद्रीय जलसंधारणमंत्री श्री. गडकरी यांची भेट घेतली.
यापूर्वी या योजनेबाबत महाराष्ट्र व कर्नाटकातील पाटबंधारे मंत्री व मुख्यमंत्री यांच्या बैठका झाल्या आहेत. दोन्ही सरकारे याबाबतीत सकारात्मक आहेत.मात्र पाणी वाटपाच्या मुद्द्यावर ही योजना अडून आहे. केंद्राने यासाठी पुढाकार घेतल्यास प्रश्न निकाली निघू शकतो, अशी भूमिका श्री. सावंत यांनी गडकरी यांच्याकडे मांडली.याबाबत अधिक माहिती घेऊन कमी खर्चात योजना साकारणार असेल, तर आपण यासाठी पुढाकार घेऊ असे गडकरी यांनी सांगितले असल्याचे श्री. सावंत म्हणाले.



No comments:

Post a Comment