Sunday, June 30, 2019
यू ट्यूबवर व्हिडीओ पाहून तिचा गेला जीव
मोबाईलवरून चांगल्या गोष्टी शिकता येतात. ज्ञानात प्रचंड भर पडते. मात्र, चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टी पाहण्याकडेच जास्त कल असतो. मनावर वाईट परिणाम होतील, अशाच व्हिडीओला पसंती दिली जात असल्याने तरुणांसोबत अल्पवयीनांमध्ये नकारात्मकतेचा भाव वाढत चालला आहे. मानसिकता वाईट होत असल्याने चोरी, लुटमार, दरोडा, खून, बलात्कार आणि आत्महत्यासारखे पाऊल उचलले जात आहेत. अशीच काहीशी घटना शनिवारी दुपारच्या सुमारास तहसील ठाण्याच्या हद्दीतील हंसापुरी येथे उघडकीस आली. दोन मुलींनी गळफास घेतल्याचा व्हिडीओ यू ्ट्यूबवर पाहिल्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक करीत असताना एका १२ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. शिखा विनोद राठोड (१२) असे मृत मुलीचे नाव आहे. जिवाचा थरकाप उडविणार्या या घटनेमुळे पालकांना विचार करण्यास बाध्य केले आहे.
मोबाईलमुळे जग जवळ आले. देशात क्रांती घडली. रविवारी, ३0 जून हा दिवस जागतिक सोशल मीडिया दिन साजरा होत असताना ही घटना घडली. खंर तर दोन मन मिळविण्यासाठी मोबाईल चांगले माध्यम आहे. परंतु, याच मोबाईलमुळे सातव्या वर्गात शिकणार्या मुलीचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढच्याला ठेच लागली की, मागचा शहाणा होतो, अशी म्हण आहे. मात्र, या घटनेवरून किती पालक बोध घेतील? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
राठोड कुटुंबीय मूळचे आग्रा (उ. प्र.) येथील राहणारे. काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात तिचे वडील विनोद राठोड हे कुटुंबीयांसह नागपूरला आले. शिखाला आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. तिचे वडील बॅग तयार करण्याचे काम करतात. तिची मोठी बहीण दहाव्या वर्गात असून शिखा ही निराला हायस्कूल येथे सातव्या वर्गात शिकत होती. घरातील मंडळीशी संवाद साधता यावा म्हणून तिच्या वडिलांनी मोबाईल घेतला होता. हा मोबाईल ते घरीच ठेवत असत. आता मोबाईल घरीच असल्यामुळे शिखा मोबाईल हाताळत असे. सतत तिच्या जवळच मोबाईल असल्याने काही ना काही ती पाहात असे. काही दिवसांपूर्वी तिने यू ट्यूबवर दोन मुली आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ पाहिला होता. हाच व्हिडीओ तिने आपल्या आईला देखील दाखविला होता. व्हिडीओ पाहून तिने प्रात्यक्षिक (डेमो) करण्याचा निर्णय घेतला होता.
शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिची आई घरकाम करीत होती. शिखा आणि तिची लहान बहीण मागच्या खोलीत खेळत होत्या. खेळता खेळात तिची लहान बहीण बाहेर निघून गेली. दरम्यान, शिखाने गळफास घेण्याचे प्रात्यक्षिक करायला सुरुवात केली. सिलिंग पंख्याला नायलॉन बेल्ट बांधला आणि गळफास लावण्याचा डेमो करीत असताना तोच फास गळय़ाला आवळल्या गेला आणि ती पंख्याला लटकली. क्षणभरातच तिची बहीण घरात आली असता शिखा लटकलेल्या अवस्थेत दिसली. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिला खाली उतरविले आणि मेयो रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment