जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील बिघडलेली वाहतूक व पार्किंगची कोंडी ताबडतोब सोडवा. बाजारात कुठेही लावल्या जाणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील विस्कटलेली वाहतूक नियंत्रणात आणण्या संदर्भात पोलीस तसेच नागरपरिषद अधिकार्यांशी वेळोवेळी बैठका झाल्या आहेत,पण अद्याप वाहतूक कोंडी फुटलेली नाही. वाहतुकीची कोंडी करणार्या खाजगी मालवाहतूक गाड्या, रिक्षा यांचा बंदोबस्त करावा, शहरामधील रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात यावे, शहरातील सोलनकार चौक ते बसवेश्वर चौक या दरम्यानचा रस्त्याचे रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे.
जतमधील सातारा- विजापूर या मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहेच,या रस्त्यावर धुळीचे साम्राज्यही आहे. त्यातच शहरामध्ये रॉकेल मिश्रीत डिझेल टाकून ऑटो चालवित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी, जनतेच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. जातमध्ये उमराणी रोड,बिळूर रोड यांसह सांगली, उमदी,विजापूर, सांगोला, निगडी मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी असलेल्या पोलिसांचा पत्ताच असत नाही. त्यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडतच राहते. सातारा-विजापूर रोडवर तर अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडी हटत नाही. याचा त्रास वाहनचालकांना होतोच, शिवाय चालणाऱ्या पादचारी मंडळींना सुद्धा होतो.
अनेकदा लोकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. जत पोलीस आणि नागरपरिषद प्रशासनाने शहरातील वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
फोटो ओळ-(जतमधील उमराणी रोडवरसुद्धा आता वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. येथील वाहतूक कोंडीचे चित्र.)
No comments:
Post a Comment