Monday, June 24, 2019

पावसाळा आला... सर्पदंशापासून सावधानता बाळगा

जत,(प्रतिनिधी)-
पावसाळा आला की दोन प्रकारच्या दुर्घटना नेहमी घडत असतात. एक म्हणजे सर्पदंश आणि दुसरा म्हणजे विजेचा शॉक. अशा दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात सर्पदंशाच्या घटना वाढू लागल्या आहेत.  आरोग्य व कुटुंब खात्याकडीला आकडेवारीनुसार 2017 मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. 24437 सर्पदंशाच्या घटना घडल्या. यात सर्वाधिक 19012 घटना घडल्या आहेत.  वेळेत उपचार न मिळाल्याने माणूस दगावण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पावसाळा आला की, सर्पदंशापासून सावधान राहणं महत्त्वाचं आहे. राज्य सरकारनेही वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

साधारण एप्रिल ते जुलै दरम्यान सर्पांचा प्रजनन काळ असतो. शिवाय पहिल्या पावसांनंतर बिळांमध्ये पाणी जाताच सर्प आणि त्याची पिले बाहेर पडतात. या काळात सर्पदंशाच्या घटना वाढतात. त्या टाळण्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे.  साप विषारी नसला तरी माणूस तो चावल्यावर हबकून जीव सोडतो. घाबरून हार्ट अटॅक येतो.  थोडा समजूतदारपणा दाखवल्यास जीव वाचू शकतो. विषारी साप चावला तरीसुध्दा योग्य काळजी आणि वेळेत उपचार मिळाल्यास रुग्ण वाचू शकतो.
आपल्या देशात सुमारे 280 जातीचे साप आढळतात. त्यातले 52 जाती महाराष्ट्रात आढळतात. आणि त्यातले फक्त दहा जाती या विषारी आहेत. बाकीचे बिनविषारी आहेत. आपल्या सांगली,कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक सीमाभागात फक्त चारच विषारी साप आढळतात. नाग,घोणस, मण्यार आणि फुरसे या त्या जाती होत. थोडी सावधानता बाळगल्यास आपल्याला सापांपासून धोका निर्माण होत नाही. त्यामुळे आपल्याला थोडी फार माहिती असायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घराच्या परिसरात अडगळ ठेवू नये. दगड, विटा, फरशांची तुकडे असा कशाचाही ढिगारा ठेवू नका. अशा अडगळीत साप आसरा शोधतात.
घरासमोर किंवा मागे बागकाम केले असेल तर कुंड्या जवळ जवळ ठेवू नका. ओल असल्याने साप या ठिकाणी आश्रय घेतात. घराजवळ सरपण असू नये. त्याचबरोबर रात्री अपरात्री घराबाहेर पडताना बॅटरी सोबत घ्या. घराच्या आजूबाजूला साप आढळल्यास आणि तो विषारी असल्याचे लक्षात आल्यास वनविभाग किंवा सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधा. तोपर्यंत त्या सापाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. फक्त त्यावर लक्ष ठेवा.
नाग हा विषारी साप सर्वत्र आढळतो. धोका जाणवल्यास तात्काळ फणा काढतो. त्यामुळे नाग साप आपल्याला सहज ओळखता येतो. त्याने दंश केल्या स अर्ध्या तासात त्याठिकाणी सूज येते.अंग जड होऊन हातपाय गळ्याल्या सारखे होतात. डोळ्यांवर झापड येते. उलट्या होतात. घाम येतो. बोलता येत नाही. लाळ गळते. गिळण्यास त्रास होतो.
दुसरा जो विषारी साप आहे तो घोणस. हा अतिशय विषारी असतो. तपकिरी रंगाचा ,जाड, अंगावर काळे ठिपके असलेला आणि कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करणारा हा साप आहे. अजगरासारखा दिसत असल्याने अनेकजण ओळखण्यात चूक करतात. याची पिल्ली जन्मजात विषारी असतात.दंश झालेल्या जागी तीव्र वेदना होतात. जखमेभोवतीचा भाग सुजू लागतो. कित्येकदा तोंडावाटे, लघवीतून रक्त पडते.
मण्यार हा साप शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर पडतो,म्हणून त्याला निशाचर साप म्हणतात. त्याच्या अंगावर काळसर पांढरे ठिपके असतात. यांच्या विषाची तीव्रता नागाच्या विषा पेक्षा अधिक असते. त्याचे विषदन्त लहान असतात. दंशानंतरची बहुतेक लक्षणे नागासारखी असतात. फरक इतकाच की, दंश झालेल्या जागेवर जळजळ होत नाही. सूज येत नाही. काही वेळानंतर पोटात आणि सांध्यांमध्ये  तीव्र वेदना होतात.
फुरसे हा आपल्याकडे क्वचितच आढळणारा साप आहे. साधारण डोंगराळ भागात तो आढळतो. डिवचले गेल्यास वेटोळे करून खवले एकमेकांवर घालतो. आणि करवतीसारखा आवाज करतो. याचे विष घोणशीपेक्षा जहाल आहे. याच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. दंश झालेल्या जागी आधी जळजळ सुरू होते आणि नंतर शरीरभर पसरते. दंश झालेल्या भागातून ,लघवीतून रक्त पडते.
कोणताही साप चावला तरी डॉक्टर कडे जाणे भाग आहे. मात्र त्या आधी काही प्रथमोपचार करणे आवश्यक आहे. पहिल्यांदा जखम स्वच्छ धुवावी. दंश झालेला भाग स्थिर ठेवावा. दंश झालेल्या भागातून थोड्या अंतरावर फळीचा आधार घेऊन कपड्याच्या तुकड्याने बांधावे. साप चावल्यानंतर त्या जागी कशानेही कापू नये. काही वेळा मुख्य रक्तवाहिनी कट होण्याचा धोका संभवतो. बँडेज पूर्ण आवळून बांधू नये. साधारण एक बोट जाईल एवढेच घट्ट बांधावे. घोणस व फुरसे चावले असेल तर बँडेज बांधू नये. संबंधित व्यक्तीला सतत धीर दिला पाहिजे. डॉक्टरांना उपचार सुरू करण्यापूर्वी दमा अथवा ऍलर्जी असेल तर सांगावे.

No comments:

Post a Comment