तुकारामबाबा यांनी जत तालुक्यात जनावरांसाठी शासनाची वाट न पाहता पहिल्यांदा चारा छावणी सुरू केली. पूर्व भागातल्या गावांसाठी त्यांनी माडग्याळ येथेही पाणी परिषद घेऊन या भागाला पाणी मिळण्याचा आग्रह धरला. लोकांनी पाण्याची मागणी करणे आणि राजकारण्यांनी अथवा सत्ताधारी मंडळींनी आश्वासन देणे,हे आता नित्याचे झाले आहे. यापूर्वी उमदी परिसरातील पाणी संघर्ष समितीने उमदी-सांगली पायी पदयात्रा काढून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी मुंबईला जाऊन संबधित मंत्र्यांची भेटही घेतली होती.परंतु त्यांना आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही.
जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे खरे,पण संपूर्ण तालुक्यात ते अद्याप खेळले नाही. तालुक्याच्या एका कोपऱ्यातून ते पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात पोहचले आहे. जतचा पूर्व भाग आणि दक्षिण भाग अद्याप या पाण्यापासून वंचित आहे. 123 गावे असलेल्या या तालुक्यातील अजून सुमारे शंभर गावे वंचित आहेत. दक्षिण भागात बिळूर परिसरात पाण्याची चाचणी घेण्यात आली आहे. आता केंद्रात पुन्हा मोदी सरकार सत्तेवर आले आहे. आगामी ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजप-सेना युतीचे सरकार आल्यास लोकांना पूर्व भागातही पाणी येण्याची आशा आहे. पाणी हा महत्त्वाचा मुद्दा धरूनच जत तालुक्यातून खासदार संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. हाच दृष्टिकोन विधानसभेला राहिल का,हा प्रश्न आहे. कारण राज्याचे मुद्दे वेगळे आहेत.
तुकारामबाबांनी सध्या राजकीय विरोधकांची भूमिका आपल्या हातात घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ही भूमिका वटवण्याची गरज होती. मात्र या मंडळींना एकत्र येऊन आंदोलन करण्याचे सुचले नाही. यापूर्वीसुद्धा त्यांनी असा प्रकार केला नाही. उलट ही मंडळी सातत्याने एकमेकाच्या विरोधात भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे.उद्या विधानसभेला हे दोघेही एकत्रित होऊन निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जतला पाणी आणि इतर सवलती देण्यासंदर्भात पावले उचलण्याची गरज होती.पण तसे काही घडले नाही. विधानसभेला कुणालाही उमेदवारी मिळाली तरी ही एकदिलाने लढतील,याबाबत शंकाच येते. त्यामुळे पुन्हा भाजापलाच संधी मिळण्याची शक्यता अधिक वाटत आहे. वंचित आघाडीकडून पुन्हा माजी आमदार शेंडगे उभारणार असल्याची चर्चा असल्याने ही निवडणूक पुन्हा चुरशीची होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जतच्या नागरपरिषदेत सत्ता आहे. अलीकडच्या काळात या दोन्ही पक्षाचे नेते एकत्र दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते विक्रम सावंत आणि राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे हे दोन्ही नेते आणि वंचित आघाडीने घेतलेली उठावदार मते पुढच्या निवडणुकीत रंगत आणतील. त्यातच भाजपच्या गोटात आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात रान उठवण्याचा प्रयत्न चालला आहे. भाजपचे तालुक्यातल्या राजकारणातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते,ते डॉ. रवींद्र आरळी यांनी भाजपने नवा चेहरा द्यावा, अशी मागणी करून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला आहे. त्यामुळे आमदार जगताप यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. साहजिकच जतची विधानसभा निवडणूक चांगलीच चर्चेत येण्याची शक्यता आहे.
सध्या तरी जतची निवडणूक तिरंगी मानली जात असली तरी तुकारामबाबांच्या रूपाने चौथा उमेदवार उभा राहू शकतो का, याची चर्चा सुरू झाली आहे. तुकाराम महाराज यांची दुष्काळाच्या निमित्ताने चांगली ओळख निर्माण होत आहे. चिखलगी भुयार (मंगळवेढा) येथील संत बागडे महाराज मठाचे ते मठाधिपती आहेत. त्यांची गोंधळेवाडी (ता.जत) येथेही एक शाखा आहे. त्यांचे पाणी शुद्धीकरणासह आणखी काही प्रकल्प आहेत. यातून शंभर लोकांना रोजगार उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी चिखलगी मठाचे मठाधिपती पदावरून वाद झाला होता. पण त्यातून तुकारामबाबा यांना हे पद मिळाले. बाबांचे भाविक महाराष्ट्र भर आहेत. सध्या त्यांचा दुष्काळी परिस्थितीच्या निमित्ताने प्रसारमाध्यमातून वावर वाढला आहे. बातम्या येण्याबाबत ते आग्रही असतात. त्यामुळे त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात आणि महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याचे उदाहरण पाहता बाबा,महाराज यांना राजकारणात चांगले दिवस असल्याने त्यांनाही निवडणूक लढवायची आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जतचे राजकारण जितके बेभवरशाचे आहे, तितकेच बेफिकीरीचे आहे. कारण इथे दहा पंधरा दिवसात आलेली व्यक्तिदेखील आमदार होते. आणि अनेक वर्षे प्रयत्न करूनही हाती काही लागत नाही. त्यामुळे नशीब ज्याचे बलवत्तर तोच इथे आमदार होऊ शकतो. 2014 ला मोदी लाट नसती तर इथे चित्र कदाचित वेगळं पाहायला मिळालं असतं. त्यामुळेच इथे नशीब अजमवायला सगळ्यांनाच संधी आहे. इथे नशिबाची साथ जोरदार असायला हवी.
It's wrong
ReplyDeleteWhat's wrong I t is ok if baba is ready so it is ok nice ground levelwork ... and I hope 1000% will be successful....
ReplyDelete