Sunday, June 23, 2019

जमिनीच्या वादातून सुसलाद येथे खून

जत,(प्रतिनिधी)-
सुसलाद (ता. जत) येथे  शेत जमिनीतील घराचे बांधकाम  अडविल्याच्या कारणावरून  भावकीतील पाचजणांनी कुर्‍हाड, काठ्या, धारधार हत्याराने मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. बसंवतराय ऊर्फ निंगाप्पा बन्नी (वय 56) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रात्री उशिरा उमदी पोलिसात  पाचजणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुसलाद येथील सावंत वस्तीजवळ  बन्नी कुटुंबीयांची वस्ती आहे. येथील भावकीतीलच लोकांशी मृत निंगाप्पा यांचे शेतजमीन व घर बांधण्यावरून वाद
सुरू होता. हा वाद तहसील, प्रांत व पोलिस ठाण्यापर्यंत ही गेला होता. निंगाप्पा यांच्या जमिनीत संशयित बांधकाम करीत होते. याबाबत  शनिवारी बसवंतराय यांनी उमदी पोलिसात  तक्रार  दिली होती.

रविवारी निंगाप्पा हे शेतात ट्रॅक्टरने काम करीत होते.  यावेळी संशयित कांतू शिदरीया बन्नी , मुदका मलकाप्पा बन्नी,  राजेंद्र मल्लाप्पा बन्नी, रावतू मल्लाप्पा बन्नी, विटाबाई बन्नी यांच्यात वाद झाला होता. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. सर्व संशयितांनी  कुर्‍हाड काठ्या, दगड, लाथा बुक्क्यांनी निंगाप्पा यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यात निंगाप्पा हे गंभीर जखमी झाले.   त्यांना तातडीने जत रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर जत व उमदी  पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. यावेळी मयत निंगाप्पाचे भाऊ श्रीशैल बन्नी यांनी  पाचजणांविरोधात फिर्याद दिली. रात्री उशिरा  संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

No comments:

Post a Comment