Monday, June 10, 2019

जत तालुक्यात रोजगार हमीच्या कामांना गती नाही

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा फटका; मजुरांची उपासमार
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून रोजगार हमी योजना कशीबशी सुरू आहे. काही अपवाद वगळता अत्यल्प प्रमाणात कामे सुरू आहेत.त्यामुळे रोजगार हमीचा लाभ जत तालुक्याला होताना दिसत नाही.

   मजुरांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने २००५ ला स्वतंत्र रोजगार हमी योजना केंद्र सरकार व राज्य सरकारने अस्तित्वात आणली. तीन वर्षांपूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे झाली होती. ही कामे संशयाच्या
भोव-यात अडकली. त्यामुळे गटविकास अधिकारी, प्रभारी  गटविकास अधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली होती. त्यामुळे आणखी जाचक अटी लादल्याने तालुक्यात ११६ ग्रामपंचायतीपैकी फक्त २५ गावांत ५४ कामे सुरू आहेत.  बहुसंख्य कामे ही घरकुलांची आहेत. या कामावर चौदाशे मजूर कामावर आहेत. वास्तविक तालुक्यात कामाची गरज असणान्यांची संख्या
मोठी आहे. तालुक्यात मोठा उद्योग ,कारखाना नाही. रोजगार हमीमुळे हाताला काम मिळत होते. केवळ
प्रशासनाच्या मानसिकतेमुळे मजुरांच्या हाताला काम नाही.
 शासनाने ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली त्यापासून आता ती बाजूला गेली आहे. जॉबकार्डधारकांना वर्षभरातून किमान शंभर दिवस रोजगार आणि तोही पाच किलोमीटरच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत व पंचायत समितीची आहे. या योजनेत सिंचन विहीर, गोठा, कंपोस्ट खत डेपो, नाडेप, शेततळे, नाला बांध, ओढ्यातील गाळ काढणे, रस्ता मुरमीकरण ,फळबाग लागवड, पाझर तलावातील गाळ काढणे, बांधबंदिस्ती, बांधावर फळबाग लागवड, शोष खड्डे यासारखी कामे प्राधान्याने घेता येतात. याचबरोबर राजीव गांधी भवन, ग्रामपंचायत कार्यालय, क्रीडांगणे, घरकुल योजना, शौचालय या कामांचा नव्याने समावेश केला आहे. तालुक्यात तुरळक प्रमाणात कामे सुरू आहेत. ही कामे मोठ्या प्रमाणात प्रशासनाने सुरू करावीत व मजुरांना शासनाने दिलेली सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आहे.
वाढत्या तापमानाचा या योजनेवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर मजुरांना कामावर असताना प्रथमोपचार पेटीसारख्या सुविधा दिल्या जात नाहीत, अशी तक्रार आहे. रोजगारसेवक मानधनापासून वंचित  आहेत. ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु गेल्या दोन वर्षापासून झालेल्या कामाचे मानधन रोजगार सेवकांना मिळालेले नाही. काम करूनही
मानधन न मिळाल्याने ग्रामरोजगार सेवक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर काम जास्त, मोबदला
कमी, अशी परिस्थिती आहे.  काही रोजगार सेवकांना
बेरोजगारीमुळे स्थलांतर करावे लागले, ऊसतोडी, वीटभट्टी आणि कारखान्यात कामावर जावे लागले
आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. रोजगार हमीची कामे उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment