Saturday, June 22, 2019

राज्यातील सहकारी संस्था डबघाईला


जत,(प्रतिनिधी)-
 सहकारी संस्थांचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील सहकाराची चक्रे उलट्या दिशेने फिरू लागली आहेत. कधी एकेकाळी राज्याची ओळख साखर कारखान्याचे राज्य अशी होती, ती आता बंद पडलेल्या कारखान्याचे राज्य अशी होताना पाहावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

राज्यात 285 साखर कारखाने असून, त्यापैकी केवळ 101 कारखाने राज्यात सुरू आहे. त्यापैकी 80 कारखाने तोट्यात आहेत. काही वर्षांत दुष्काळाची निर्माण झालेली अवस्था, यातून ऊस लागवडीकडे झालेले दुर्लक्ष, त्याला लागणारे मुबलक पाणी, त्यातून जमिनीची होणारी नासाडी यासारख्या बाबी पुढे येत असतानाच शेतकर्यांनी फळबाग शेतीकडे लक्ष वळविले. शिवाय सहकारातील राजकारण, त्याचा परिणाम राज्यातील साखर कारखानदारी होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावरती साखर कारखाने अस्तित्वात आल्यानंतरही ते बंद पडण्याचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणावर असल्याची बाब समोर आली आहे.
 साखर कारखान्यांपाठोपाठ सूतगिरणीची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. राज्यात सूतगिरण्याची संख्या 285 असून त्यापैकी 58 सूत गिरण्या तोट्यात आहेत. त्यांचा तोटा 1834 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. राज्यातील बिगर कृषी सहकारी संस्थांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. वीस हजार 668 इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्यात या सहकारी संस्था अस्तित्वात आहे.
राज्यात ग्रामीण भागात बँकांना पर्याय म्हणून बिगर शेती सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात आली. आरंभी या संस्थांमध्ये कामगार, शेतमजूर यांच्यासाठी बचतीचे केंद्र म्हणून पाहिले जात होते. त्यानंतर ग्रामीण भागात तरूणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी या संस्था मदतगार ठरु लागल्या. सध्या या संस्थांकडे 1900 कोटी ठेवी आहेत. मात्र, कर्ज घेण्यासाठी ग्राहक मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ठेवीवर व्याजदर देणे या संस्थांना दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, केंद्र सरकारने गेल्या काही वर्षापासून सुरू केलेल्या नवीन योजना. त्यासाठी व्याजदर ही कमी प्रमाणात असल्याने पतसंस्थांकडचा ओढा आटला आहे. मुद्रा कर्ज वितरण, शेतकरी सोनेतारण, किसान क्रेडिट कार्ड, अल्प व्याजदराने कर्जाचे वितरण, व्याजावरती मिळणार्या सवलती या सर्व बाबींमुळे पतसंस्थेच्या ठेवींना कर्जदार मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या संस्थाही काहीशा अडचणीत सापडल्या आहेत.

No comments:

Post a Comment