Thursday, June 20, 2019

बळीराजाची खरिप हंगामासाठी लगबग सुरू

जत,(प्रतिनिधी)- 
यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने आणि मान्सूनपूर्व पावसानेही दडी मारल्यामुळे  पुन्हा एकदा खरिपाचे पीक हातातून जाते की काय याचेच मोठे संकट उभे ठाकलेले असताना मान्सून कोकणात दाखल झाल्याची खुशखबर हवामान विभागाने दिल्याने बळीराजाची खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात आलेल्या 'वायू' वादळामुळे मान्सूवर परिणाम होणार असल्याची शक्यता त्यावेळी वर्तवण्यात येत होती. शिवाय, वायू वादळानंतर झालेल्या बदलामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर लागणार असल्याचे वृत्त होते. आता मान्सून कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील भागात दाखल असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असून पुढील दोन-तीन दिवसात राज्यात पावसाची अनुकूल स्थिती लक्षात घेऊन बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.
मागील वर्षीच्या दुष्काळाने सर्व पिके नष्ट झाल्याने आता पेरणीला पैसे आणायचे कुठून आणि बँकांचे कर्ज भरायचे तरी कसे? असे दुहेरी संकट सध्या शेतकर्‍यांसमोर आहे. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी पावसाचे आगमन न झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडला आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन आठवडे होत आहेत, परंतु वरुणराजाने शेतकर्‍यांकडे अक्षरश: पाठ फिरवली आहे. रोहिणी नक्षत्राने पावसाळा सुरू होतो. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात मृग नक्षत्रात मान्सूनचे आगमन होते आणि वरुणराजा जोरदार बरसल्यानंतर बळीराजा शेतीची मशागत करून पेरणी करतो. पण यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला. यंदा दुष्काळी परिस्थितीतही राज्याच्या विविध भागात शेतकर्‍यांनी भाजीपाल्याच्या रोपांची लागवड केली, परंतु पाण्याअभावी व अति तापमानामुळे जवळपास निम्मी रोपे करपून गेली. मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला. खरीप हंगाम सुरू झाल्याने आता तरी पाऊस पडेल आणि उडीद, मूग, बाजरी, ज्वारी यासारखी खरिपाची पिके पेरता येतील, याच आशेने शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
दुष्काळाने होरपळ होत असलेल्या गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांची लगबग सुरू आहे. पाऊस आल्यावर धावणार्‍या पाण्याला चालायला, चालणार्‍या पाण्याला थांबायला आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला लावणार्‍या जलसंधारण कामे वेगात सुरू आहेत. दुष्काळाग्रस्त जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यायचे असेल तर पाणी आता डोळ्यात नाही तर गावात दिसण्याची आस लागली आहे.
तहान भूक विसरून, आग ओकणार्‍या सूर्याची तमा न बाळगता हजारो हात गावच्या शिवारात राबत आहेत. दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अबालवृद्धांचे हजारो हात फावडे, घमेली आणि टिकाव घेऊन जलसंधारणाची कामे साकारत आहेत. शोषखड्डे काढून शौचालये उभारली जात आहेत. पाण्याचा ताळेबंद मांडला जात आहे. जुन्या जलसंरचनांचे खोलीकरण, रुंदीकरण आणि दुरुस्ती केली जात आहे. गावच्या शिवारात पडणारे पावसाचे पाणी शिवारातच जिरण्यासाठी गावातील प्रत्येकजण स्वत:चे योगदान देत आहे. जलसंधारण करता करता मनसंधारणही होत असल्याने गावोगावी एकोप्याची भावना वाढू लागली आहे.
कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत खरीप हंगामपूर्व तयारीबाबत बैठक शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पीक नियोजन, बीज प्रक्रिया महत्त्व, माती व पाणी परीक्षण, पिकांवरील लष्करी आळीचे एकात्मिक नियंत्रण, गुलाबी बोड अळीचे नियंत्रण, दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे व्यवस्थापन, पीक विमा, कीटकनाशक हाताळणी आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येऊन माहिती देण्यात येत आहे. पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्याचे आवाहान कृषी खात्याने शेतकर्‍यांना केले आहे.

No comments:

Post a Comment