Sunday, June 16, 2019

शिक्षकांची आयकर कपात शाळा स्तरावरून करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा आयकर  कपात पंचायत समिती ऐवजी शाळास्तरावरून मुख्याध्यापक मार्फत करण्याची मागणी जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत करण्यात आली. यावेळी संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील  शिक्षकांचा आयकर कपात जत पंचायत समिती मार्फत केला जातो.टॅक्स कन्सल्टंट एकच असल्याने शिक्षकांची आयकर बाबत अनेक तक्रारी असून अनेक शिक्षकांचा टॅक्स पगारातून कपात होतो पण तो टॅक्स पॅन कार्ड वर दिसत नाही.त्यामुळे शिक्षकांना आयकर विभागाकडून दंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावेळी जमा नसलेली आयकर रक्कम हडप झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तसेच तालुक्यातील प्रत्येक शाळेचे स्वतंत्र टॅन नंबर उपलब्ध असून त्या त्या शाळातील शिक्षकांची आयकर कपात रक्कम मुख्याध्यापक खात्यावर वर्ग करून मुख्याध्यापक यांना आपल्या स्वतच्या शाळेचा स्वतंत्रपणे टॅक्स कन्सल्टंट  नेमणूक करण्याचा आदेश सर्व शाळांना पंचायत समिती जत मार्फ़त गट विकास अधिकारी यांनी द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे,विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे, जिल्हा उपाध्यक्ष मलेशप्पा कांबळे, तालुकाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, तालुका सरचिटणीस संदीप कांबळे, कार्याध्यक्ष महादेव तंगोळी आदी उपस्थित होते.

फोटो ओळ (जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती वाघमळे यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मागासवर्गीय संघटनेने निवेदन दिले.)

No comments:

Post a Comment