Sunday, June 30, 2019

भारतात घटतेय पारंपरिक विवाहपद्धती!

भारतात, मुख्यत्वे शहरी भागात पारंपरिक विवाहांचे प्रमाण कमी होत आहेत. त्यांची जागा प्रेमाला संमती मिळून होणारे विवाह घेत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका महिलाविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वैवाहिक हिंसा कमी होत असून, अर्थ किंवा कुटुंब नियोजनासारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांत महिलांना महत्त्व देण्यात येत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

आई-वडिलांनी पसंत केलेल्या व्यक्तीशी पाल्ल्याने विवाह करण्याची भारतीय परंपरा आहे. अनेकदा तर तरुणी विवाहाच्या दिवशीच आपल्या होणार्‍या पतीला पाहत; परंतु कालानुरूप अशा विवाहांत घट होऊ लागली आहे. प्रामुख्याने शहरी भागांत मुलगा आणि मुलीने पसंत केलेल्या व्यक्तीला पालकांकडून सर्मथन मिळून होणार्‍या विवाहांची संख्या वाढत आहे. अशा विवाहांमध्ये आई-वडील फार तर सल्ला देण्याचे काम करतात; मात्र कुणाशी विवाह करायचा हा निर्णय तरुणीच घेतात. संयुक्त राष्ट्रांच्या जगातील महिलांची प्रगती २0१९-२0२0 या अहवालात हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
पारंपरिक विवाहाच्या तुलनेत प्रेमविवाह किंवा प्रेमाला संमती मिळून होणार्‍या विवाहांत खर्च, कुटुंब नियोजन किंवा अन्य महत्त्वाच्या निर्णयांत महिलांना तीनपट अधिक विचारात घेतले जाते, तर मित्रमंडळी किंवा नातेवाईकांना कधी भेटण्याचे हे ठरवण्याचे त्यांना दुप्पट स्वातंत्र्य असते. याशिवाय प्रेमसंमतीच्या विवाहामध्ये पारंपरिक विवाहपद्धतीच्या तुलनेत वैवाहिक हिंसेचे प्रमाणही कमी असते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दक्षिणी व पूर्वी आशिया, सहारा आफ्रिका आणि उत्तर आफ्रिका आणि पश्‍चिम आशिया या भागांत विवाह हा सार्वभौमिक आणि सामाजिकदृष्ट्या अनिवार्य आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये हुंडा प्रथेला प्रतिबंध असताना व त्याविरोधत अनेक मोहिमा राबवण्यात येत असतानाही एकूणच दक्षिण आशियामध्ये ही प्रथा कायम आहे, तर भारतात आर्थिक उदारीकरण आणि व्यापारीकरण होत असताना कुटुंबाची आर्थिक स्थिती हा आजही विवाहाशी संबंधित महत्त्वपूर्ण घटक असल्याचे हा अहवाल सांगतो.

No comments:

Post a Comment