जत,(प्रतिनिधी)-
पांडोझरी (ता. जत) येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थी ६९ झाडांची उन्हाळ्याच्या सुटीतही संवर्धन व जोपासना करीत आहेत. चिमुकल्यांची वृक्षसंवर्धन करण्याची जिद्द पाहून संख (ता. जत) येथील श्रीशैल बसगोंडा यळझरी यांनी झाडांसाठी टँकरचे पाणी दिले आहे.
पूर्व भागातील आसंगी तुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबर वस्ती जिल्हा परिषद शाळेत ६९ वृक्षांची लोकसहभागातून लागवड केली आहे. लिंबू, नारळ, चिंच, अशोक, कडुलिंब, जास्वद, जांभूळ, गुलमोहर, मोरपंखी, सीताफळ व इतर प्रकारची झाडे लावली आहेत. ही सर्व झाडे माळरानावर दुष्काळी परिस्थितीत यशस्वीरित्या जगवली जात आहेत.
जानेवारीपासून मुले दररोज कॅनने पाणी घालत आहेत. पण दुष्काळी परिस्थितीमुळे हातपंपही कोरडा पडला. मुले घरातून शाळेला येताना पाण्याच्या बाटल्या आणून पाणी घालत होती. या मुलांची धडपड पाहून संख (ता. जत) येथील पर्यावरणप्रेमी श्रीशैल यळझरी यांनी संपूर्ण उन्हाळाभर शाळेतील झाडांना टँकरने मोफत पाणी देण्याचा शब्द दिला. त्यानुसार झाडांना टॅँकरने मुलांच्या मदतीने पाणी घातले जात आहे.
झाडे जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमी बाबू मोटे,केरुबा गडदे, आप्पासाहेब मोटे, निंगाप्पा वज्रशेट्टी, नामदेव मोटे, आयुब जमखंडीकर, चंद्रकांत कांबळे, मैहबूब जमखंडीकर, प्रकाश बाबर, मारुती बाबर, तुकाराम बाबर, पुंडलिक खांडेकर, तानाजी कोकरे, आकाश गडदे, बंडू गडदे, दत्तात्रय कोरे, आप्पासाहेब गडदे, धयाप्पा गडदे, माणिक बाबर, संदीप कर्वे, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे.
हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. वाड्या-वस्त्यांवरील विहिरी व डोहातील पाण्याने तळ गाठला आहे. मुलांमध्ये झाडांबद्दल प्रेम निर्माण केले. स्वेच्छेने मन लावून झाडे जगविण्याचे काम ही मुले करीत आहेत.
- दिलीप वाघमारे, मुख्याध्यापक, बाबरवस्ती, पांडोझरी
No comments:
Post a Comment