Sunday, June 9, 2019

पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याने चारा छावण्यांतील जनावरांची हेळसांड

जत,(प्रतिनिधी)-
सध्या राज्यात चारा व पाणी टंचाईची  तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे . सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शेतकरी दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी चारा छावणीचा  आधार घेत आहेत .जत तालुक्‍यात आज अखेर २७  चारा छावण्या मंजूर असून त्यापैकी २५ चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सुमारे १३ हजार २२० लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत .परंतु  सुमारे तिन हजार जनावरामागे एक पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याचे चित्र  दिसून येत आहे .त्यामुळे योग्य उपचाराअभावी छावणीतील जनावरांची हेळसांड होताना दिसत आहे.

     सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणूनच जत तालुक्याकडे पाहिले जात आहे . या तालुक्यात खिलार व इतर जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . परंतु  तालुक्यांमध्ये श्रेणी एक चे १४  व श्रेणी दोन चे ९   असे एकूण २३  पशुवैद्यकीय दवाखाने आहेत . श्रेणी- दोन चे दवाखाने कोंत्येंवबोबलाद ,  अंकले , वळसंग , तिकोंडी , डफळापूर , बिरूळ , मुचंडी , शेगाव , वाळेखिंडी  या नऊ गावात आहेत तर श्रेणी - एक चे दवाखाने जत , उमदी  ,सोन्याळ ,येळवी ,बोर्गी ,  संख , कुंभारी दरीबडची ,सनमडी ,उमराणी , वज्रवाड , माडग्याळ या चौदा गावात आहेत . पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे मंजूर आहेत त्यापैकी पाच जण कार्यरत आहेत .त्यातील दोन जण प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी काम करत असून नऊ पदे रिक्त आहेत . सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांची तीन पदे मंजूर आहेत . त्यापैकी दोन जण कार्यरत आहेत त्यापैकी एक जण प्रतिनियुक्तीवर काम करत असून एक पद रिक्त आहे . जत तालुक्यातील  पशुवैद्यकीय अधिकारी व  सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी अशी एकत्रित मिळून दहा पदे रिक्त आहेत . कार्यरत असलेल्या सात पैकी तीन जण प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी काम करत आहेत .प्रत्यक्षात चारच पशुवैद्यकीय अधिकारी जत तालुक्यात काम करत असून  त्यांच्याकडून सुमारे १३  हजार २२० जनावरांची देखभाल , लसीकरण , टँगींग केले जात  आहे.
        जत  तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्यामुळे व दोन गावातील आंतर जादा आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याना  एका छावणीतून दुसऱ्या छावणीत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे याशिवाय वेळेचे नियोजन करताना त्यांची तारांबळ उडत आहे . सहा  प्रशिक्षणार्थी पशु वैद्यकीय  अधिकारी जत येथे आले आहेत त्यांच्याकडून लसीकरण व दैनंदिन उपचार करुन घेण्यात येणार आहेत .त्यामुळे या  रिक्त असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची जागा प्रशिक्षणार्थी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जमेल तसे  काम करून घेवून भरून घेतले  जाणार आहे .अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव साळे , डॉ. विष्णू जवणे व डॉ. सदाकळे  यांनी दिली आहे. 
जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती राज्याच्या राजकारणातील एक चर्चेचा विषय झाली आहे . छावणीतील जनावरांना तिव्र उन्हामुळे उष्माघाताचा परिणाम जाणवत आहे . त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता  नाकारता येत नाही .  छावणीतील जनावरांना खाद्य कोणत्या प्रकारे मिळते त्यावर जनावराची प्रकृती व होणारे परिणाम लक्षात येत आहेत. कांही छावणी चालक छावणीतील जनावरांना कमी प्रतीची गोळी पेंड व चारा देत आहेत .शासकीय अधिकारी छावणी तपासणीसाठी आल्यानंतर त्यांना चांगल्या प्रतीची गोळी पेंड व चाऱ्याचे नमुने तपासणीसाठी दिले जात आहेत त्यामुळे छावणीत सुरू असलेला हा चारा व गोळीपेंड घोटाळा वरिष्ठांनी उघडकीस आणने आवश्यक आहे .सध्या जत तालुक्यात पाण्याचे साठे कोरडे पडले आहेत .  चाऱ्याच्या उपलब्धतेचे प्रमाण कमी झाले आहे . कर्नाटक राज्यातून चारा आणून त्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पशुधन मालक आपल्या जनावरांना छावणीत  नेऊन ते जगविण्यासाठी धडपड करत आहेत .
जत तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे  तालुक्यातील सुमारे साडेतेरा हजार हून अधिक जनावरे चारा छावणीतील दावणीला बांधण्यात आली आहेत जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे .छावणीतील जनावरांना उस्मा , दाह , गोचीड , ताप ,जुलाब असे आजार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत .त्यामुळे रिक्त असलेल्या पशु वैद्यकीय  व सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरून घेऊन छावणीतील जनावरांची देखभाल करण्यात यावी अशी मागणी जत तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी व दुंडाप्पा बिराजदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment