जत,(प्रतिनिधी)-
शहरासह परिसरात सध्या वाढत्या तापमानाचा
कहर असून उकाडा सोसवेनासा झाला आहे. दमदार पाऊस झाला तर दिलासा मिळेल या आशेवर गेल्या काही दिवसांपासून परिसरात
पावसाची प्रतीक्षा लागून आहे. दमदार पाऊस झाल्यास पेरणीच्या कामाला
वेग येणार आहे. त्यामुळे बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात दुष्काळामुळे परिसरातील जलपातळीही कमालीची खालावली असून अनेक विहिरी व बोअरवेल आटल्या आहेत. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेस तर शहरातील जवळपास सर्वच रस्ते ओस पडत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. परिणामी बाजारपेठेवरही याचा परिणाम झाला आहे. अशात उष्णता कमी होत नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा उष्णतेची लाट अधिक असल्याचे जाणवले. परिणामी सर्वत्र पाणीटंचाई निर्माण होत काही भागात तर परिस्थिती गंभीर आहे. मृग नक्षत्र कोरडे जात असून जून मध्यानंतरही दमदार पावसाचे संकेत दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून दमदार पावसाअभावी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेतकर्यांची शेतीची पेरणी रखडली आहे.
कोसळून वेळेवर पावसाळा सुरु होईल अशी अपेक्षा नागरिकांना लागून होती. मात्र जून मध्यानंतरही वरुणराजाची कृपा होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गेल्या 4 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या; मात्र काही मिनिटांसाठी पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याऐवजी उकाड्यात वाढ झाली आहे. पावसाला विलंब लागत असल्याने शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
No comments:
Post a Comment