जत,(प्रतिनिधी)-
माझ्या मामाची रंगीत गाडी हो,
तिला खिल्लार्या बैलांची जोडी हो
कशी दौडत दौडत जाई हो...
आज स्पर्धेच्या युगात मामाबरोबरच मामाचा गावही हरवला आहे, मामाच्या गावाबरोबरच मामाची रंगीत गाडीही हरवली आहे, मामाच्या रंगीत गाडीबरोबर ही गाडी ओढणारी खिल्लार्या बैलांची जोडीही हरवत चालली आहे!
यांत्रिकीकरणाच्या युगात सर्व काही यंत्रावरच सुरू असल्याने शेतीमधून बैलांची जोडी हरवत चालली आहे. विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स छोट्या छोट्या आकारात येऊ लागले असून औजारांच्याही नानातर्हा बाजारात आल्या आहेत. अगदी खेड्यापाड्यांतील प्रत्येक घरापुढे यांत्रिकीकरणाच्या औजारांचा खच पडलेला दिसून येत आहे. याचवेळी दुसरीकडे शेतकर्यांच्या दारी उभी असणारी गोठ्याची दावण कमी कमी होत चालली आहे. शेतकर्यांच्या जवळ असणारा गाई गुरांचा गोतावळा आज हरवत चालला आहे.
गेली 25 ते 30 वर्षे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंत्राचा वापर जसजसा वाढू लागला तसतसा शेतकर्यांजवळ असणारा जनावरांचा गोतावळा कमी कमी होऊ लागला. पूर्वी एखाद्या शेतकर्याकडे बैलाची जोडी हमखास असायची. तालेवार शेतकरी असला तर साधारणपणे चार-चार, सहा-सहा धष्टपुष्ट बैलेही त्यांच्या दावणीला असायची. आता काळ बदलला असून यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर शेतीमध्ये कमी होऊ लागला आहे. प्रत्येक शेतकर्याकडे असणारी बैलाची जोडी आज बाजारात जाऊ लागली असून एक बैल पाळणेही आता शेतकर्यांना अवघड बनले आहे. हा एक बैलही आता दावणीला राहिलेला नाही.
असे असले तरी अद्यापही काही भागात बैलजोडीनेच शेतातील सर्व कामे केली जात आहेत. यंत्रापेक्षा त्यांचा बैलावरच विश्वास असल्याचे दिसून येते. आता मान्सूनचे दिवस सुरू झाले असले तरी अद्यापही पाऊस नाही. शेतकरी मॉन्सून पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
No comments:
Post a Comment