Monday, June 10, 2019

सर्वाधिक विमान अपघात भारतात

भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात होणार्‍या एअरमिस (बिघाड, अपघात) यांचे प्रमाण जगाच्या तुलनेत अधिक आहेत. परिणामी सुरक्षिततेच्या अधिक उपाययोजना आखण्याची मागणी आता होऊ लागली आहे. माहिती अधिकारांतर्गत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) मिळालेल्या माहितीनुसार भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये घडणार्‍या बिघाड, अपघातांचे प्रमाण सन २0१८ मध्ये प्रति १0 लाख विमानामागे १६.१८ आहे.

२0१७ च्या तुलनेत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. २0१७ मध्ये हे प्रमाण १0.४१ होते. तर, २0१४ ला १६.४९, २0१५ ला ११.७५ व २0१६ ला १३.१ होते. २0१४ ते २0१८ या पाच वर्षांच्या कालावधीत २0१४ ला हे प्रमाण सर्वात जास्त १६.४९ एवढे होते. त्यानंतर ते कमी होऊन आता पुन्हा वाढले आहे. अँड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी डीजीसीएकडे माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या माहितीनंतर ही बाब समोर आली आहे. २00८ ते २0१५ या कालावधीत जगभरात विमान अपघातांच्या प्रमाणात घट झाली होती. या कालावधीत १११ अपघात घडले. यातील १५ अपघातांमध्ये जीवितहानी झाली होती. त्यामध्ये ५४४ जणांना जीव गमवावा लागला होता, तर २0१६ मध्ये जगभरात १३४ अपघात घडले. त्यापैकी ८ अपघातांमध्ये जीवितहानी झाली. यामध्ये १८३ जणांचा मृत्यू झाला होता. २00८ ते २0१५ या कालावधीत भारतात झालेल्या ८ अपघातांपैकी २ अपघातांमध्ये जीवितहानी झाली होती व १५९ जणांचा मृत्यू झाला होता. २0१६ मध्ये भारतात ३ अपघात झाले. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झाली नव्हती. याबाबत अल्मेडा व पिमेंटा म्हणाले, २0१७ च्या तुलनेत २0१८ मध्ये बिघाड, अपघातांचे प्रकार वाढल्याने ते टाळण्यासाठी अधिक कडक उपाययोजना आखण्याची गरज आहे. डीजीसीएकडून जास्त कठोर उपाययोजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. देशातील हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ होत असताना बिघाड, अपघात कमीत कमी होतील याची काळजी घेणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment