Friday, June 21, 2019

देशी कलाकारांचे विदेशी जोडीदार

बॉलिवूडमधील प्रख्यात कलाकारांचे खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहे. त्यातून या कलाकारांचे प्रेमजीवन आणि विवाह या बद्दल कायमच सर्वच चाहत्यांना कुतूहल वाटत आले आहे. म्हणूनच काही अभिनेत्रींनी आयुष्याचे जोडीदार म्हणून विदेशी नागरिकांची निवड केली, तेव्हा त्यांच्या या निवडीबद्दलही पुष्कळ चर्चा ऐकावयास मिळाली. यामध्ये प्रामुख्याने नाव येते ते म्हणजे अभिनेत्री प्रीती झिंटा हिचे. उद्योजक नेस वाडिया यांच्याशी प्रीतीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा अनेक वर्षे गाजत असतानाच हे संबंध संपुष्टात आले, आणि त्यानंतर २0१६ साली प्रीतीने तिचा अमेरिकन जोडीदार जीन गुडइनफ याच्याशी लॉस एंजिल्स येथे एका खासगी समारंभामध्ये विवाह केला. प्रीतीप्रमाणे अभिनेत्री सेलिना जेटली हिनेही आयुष्याचा जोडीदार म्हणून पीटर हॉगची निवड केली. पीटर व्यवसायाने एक यशस्वी हॉटेलियर असून, ऑस्ट्रिया या देशाचा नागरिक आहे. २0११ साली या दाम्पत्याने ऑस्ट्रिया येथे विवाह केला असून, आता या दाम्पत्याला जुळी मुले आहेत.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह अलिकडच्या काळामधील सर्वात चर्चिल्या गेलेल्या विवाहांपैकी एक आहे.निक जोनास सुप्रसिद्ध पॉपगायक असून, मेट गालाच्या झगमगत्या समारंभामध्ये या दोघांची प्रथम भेट झाली होती. त्यानंतर काहीच महिन्यांच्या अवधीमध्ये दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला होता. प्रख्यात अभिनेते कमल हसन यांची कन्या र्शुती हसनही प्रसिद्ध अभिनेत्री असून, दक्षिणेकडील चित्रपटांच्या सोबत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकली आहे. र्शुती हसनने मायकल कोर्सेल या मूळच्या इटालियन असलेल्या पण लंडनमध्ये वास्तव्य असलेल्या अभिनेत्याशी विवाह केला आहे. बॉलिवूड अभिनेत्यांनी देखील स्वत:साठी विदेशी जोडीदाराची निवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने उदाहरण देता येईल ते म्हणजे प्रख्यात अभिनेते शशी कपूर यांचे. शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर केंडाल मूळच्या ब्रिटिश असून, त्याही व्यवसायाने अभिनेत्री होत्या. या दोघांची ओळख कलकत्ता येथे झाली असून त्याकाळी दोघेही आपापल्या थियेटर ग्रुपसाठी काम करीत होते. १९५८ साली दोघे विवाहबद्ध झाले. एके काळी सुप्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळखले जाणारे आणि सध्याच्या काळामध्ये 'पिंकॅथॉन' या खास महिलांसाठी सुरु केलेल्या फिटनेस मूव्हमेंट साठी ओळखले जाणारे मिलिंद सोमण यांनी ही २00६ साली मायलीन जम्पानोई या फ्रेंच अभिनेत्रीशी विवाह केला होता, पण अवघ्या तीनच वर्षांमध्ये हे विवाहसंबंध संपुष्टात आले.

No comments:

Post a Comment