Wednesday, June 26, 2019

वाघाच्या मावशीवर संक्रांत!

जत,(प्रतिनिधी)-
वाघाची मावशी म्हणून संबोधल्या जाणार्या मांजरांची जत  तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात शिकार होत असून त्यामुळे मांजरांची संख्या कमी होऊ लागली आहे. परिणामी घराघरांत उंदीर,पाळी यांनी उच्छाद मांडला आहेशहराच्या आसपासच्या गावांत अनेक शिकारी हे रिक्षा व मोटारसायकलीवर कुत्रे व लोखंडी जाळीचा पिंजरा घेऊन फिरताना दिसून येतात. खेडेगावात पडक्या वाडे, घरांच्या आडवळणी जवळ लोखंडी पिंजरा लावला जातो. त्या पिंजर्यात बोंबिल अथवा उंदीर ठेवलेला असतो. मांजराचे बोंबिल हे आवडते खाद्य असल्याने वासाच्या आधारे ते पिंजर्यात अलगद अडकते. खेडे गावात दाटीवाटीच्या झाडा झुडपात कुत्र्यांच्या सहाय्याने मांजरांची शिकार केली जाते.

मांजर दिसायला देखणे असून ते घराचे रक्षण करते. उंदीर, घूस, सर्प यापासून मांजर मानवाचे संरक्षण करते. मांजराची नजर अंधारातही तीक्ष्ण असून आवाजाबाबतही मांजर चाणाक्ष असते. घरातील सदस्यांच्या पायात घुटमळते. मानवाला सहसा त्रासदायक नसणार्या  या पाळीव प्राण्यावर शिकारीचे मोठे संकट ओढवले आहे. वन विभागाचे याकडे कोणतेही लक्ष नाही.शिकार्यांच्या या सैराट वृत्तीमुळे मांजरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मांजरांची संख्या दिवसेंदिवस अगदी कमी होत असून त्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडण्याची शक्यता आहे.
खेडेगावात या शिकारींची कोणीही दखल घेत नसल्याने दिवसेंदिवस मांजरे  कमी होत आहेत. अनेकांच्या घरात अगदी सहज वावरणारी मांजर दिसेनाशी झाली आहे. दिवसा व रात्री मांजरांची शिकार होत असल्याने पुढील काही वर्षात निसर्गाचा समतोल बिघडू शकतो. उंदीर, घुस यासारख्या त्रासदायक प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मांजरांची शिकार करणार्यांकडे कोणाचेही लक्ष नसल्याने या भागातील मांजरांची संख्या कमालीची घटली आहे. गल्ली बोळात सहज रस्त्याने आडवे पळणारे, म्याव म्याव करणारे मांजर शिकार्यांच्या जाळ्यात अडकल्याने त्यांचा आवाजही लवकरच दुर्मिळ होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वन विभाग व प्राणी मित्र संघटनांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे मांजरांची शिकार होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी दक्ष राहण्याची गरज असून लोकांनी शिकार करायला आलेल्या लोकांना गावातून हाकलून द्यावे, अशी मागणी होत आहे

No comments:

Post a Comment