Friday, June 14, 2019

शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे: काडसिध्देश्वर स्वामी

जत,(प्रतिनिधी)-
शेतीमध्ये रासायनिक खतांचा
असंतुलित वापर वाढल्याने जमिनीतील जैविक घटकांचा विनाश होऊन माती मृतावस्थेत पोहचली आहे, तसेच तणनाशके, कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून उत्पादित शेतीमालात आरोग्यास अपायकारक अशा रासायनिक घटकांचे प्रमाण वाढून त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या करिता शेतक-यांनी जैविक शेतीकडे वळावे व चांगले दर्जेदार उत्पादन घ्यावे, असे
मोलाचे मार्गदर्शन कोल्हापूरच्या कण्हेरी मठाचे  मठाधिपती अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी यांनी बालगाव (ता.जत) येथे केले.

बालगाव ता.जत येथील श्री.गुरूदेव आश्रममध्ये स्वावलंबी कृषी समावेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विजापूर ज्ञानयोगी आश्रमाचे श्री सिध्देश्वर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री गुरूदेव आश्रमाचे डॉ.अमृतानंद स्वामी, कर्नाटक राज्याचे कृषी व पणन विभागाचे आयुक्त  कौमार, डॉ.रविंद्र आरळी, प्रभाकर जाधव हे होते. काडसिध्देश्वर स्वामी पुढे म्हणाले की,कीटकनाशकांचा अतिप्रमाणात व अनावश्यक वापर रोखण्यासाठी प्रत्येक शेतक-याने सेंद्रीय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना द्यावी, या शेतीमुळे विषमुक्त फळे, भाजीपाला, अन्नधान्य उत्पादन होईल तसेच पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रीय शेती विकसित करावी.रासायनिक खतांच्या वापरामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भातील शेतीबर आपत्ती येत आहे. त्यामुळे जैविक शेतीचा अवलंब केल्यास शेतक-यांना अधिक उत्पादन घेता येईल. रासायनिक शेतीतील उत्पादनाने मधुमेह कॅन्सरसारखे रोग फोफावत आहेत. करिता आपण आपली कार्यपद्धती बदलली पाहिजे आणि बाजारपेठ असलेली मागणी पाहून शेतक-यांनी आपल्या मालाचे उत्पादन विकावे व स्वावलंबी बनावे तरच शेतकरी आत्महत्या रोखू शकतात. सरकार कर्जमाफी करत नाही, करिता इत्पादक व उपभोक्ता या दोघांनी जागरूक होणे गरजेचे आहे.
कृषी विभागाकडे सरकारचे दुर्लक्षित धोरण असून, शेतकऱ्यानी सेंद्रीय शेतीसाठी कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढवावे, असे मोलाचे मार्गदर्शन काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी केले. यावेळी सिध्देश्वर स्वामीजी यांचे प्रवचन झाले. नैसर्गिक पोळी आणि आमरस हा जो शेतकऱ्यांना महाप्रसाद केला आहे तो मला सर्वात जास्त आवडला आहे, असे स्वामी म्हणाले.

No comments:

Post a Comment