तालुका पाणी संघर्ष समितीची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
उमदी येथे आठवड्यातून दोन दिवस अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज चालावे असा आदेश शासनाचा असला तरी संख अप्पर तहसीलदारांकडून तसा आदेश नसल्याचे कारण देत आदेशाला वाटाण्याचे अक्षता दाखविल्या आहेत. सध्या उमदी येथे कामकाज बंद असून शासनाने उमदीला अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे, अशी मागणी तालुका पाणी संघर्ष समितीने मुख्यमंत्रयांकडे केली आहे.
तालुका पाणी संघर्ष समितीने संख बरोबर उमदी येथेही अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी करत जन आंदोलन केले होते,प्रसंगी कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान खासदार संजय पाटील आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार विलासराव जगताप यांच्या सांगण्यावरून उमदी व परिसरातील गावांना संख हे गांव लांब पल्ल्याची व गैरसोयीची होते. हे लक्षात उमदी येथे आठवड्यातून दोन दिवस अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज करण्याचा शासनाकडून विनंती आदेश मिळवला. व त्या प्रमाणे संबंधित वरिष्ठ अधीकारी यांनी जागेची पाहणी केली . मुहूर्ताप्रमाणे आचारसंहिता असल्याने छोटासा कार्येक्रम घेऊन कामाला सुरुवातही केली.
मात्र सध्याचे संख येथील अप्पर तहसीलदार यांनी उमदीला येण्यास वा उमदी येथे कामकाज चालविण्यास स्पष्ट नकार देऊन आम्हाला उमदीचे आदेश नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या उमदी येथील अप्पर तहसील कार्यालय बंद आहे.त्यामुळे लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने आदेश देऊन उमदी येथे पुन्हा अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
केवळ विनंतीची आदेश न ठेवता शासनाकडून कायमस्वरूपी आदेश व्हावे यासाठी खासदार व आमदारांनी पाऊले उचलावी अशीही मागणी तालुका पाणी संघर्ष समितीने खासदार व आमदार यांच्याकडे केली आहे.
No comments:
Post a Comment