जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्वभागातील दुष्काळी गावांचा दरवर्षी
पडणारा दुष्काळ हा कायमस्वरुपी हटवायचा असेल तर कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी आल्याशिवाय पर्याय नाही.
जत तालुक्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी
व पाणीपुरवठा मंत्री डी. के. शिवकुमार यांची
भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे. मात्र यातून अद्याप काहीच
स्पष्ट झाले नसल्याने गंभीर बाब निर्माण झाली आहे. एक तर संपूर्ण
तालुक्यात म्हैसळ योजनेचे पाणी खेळवावे लागेल किंवा तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी आणावे लागेल. पण कर्नाटकातून पाणी मिळण्याची
आशा धुसर झाली आहे.कर्नाटकने कोयनेचे पाणी मागितले तेव्हा राज्य
सरकारने जत आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना कर्नाटकने पाणी द्यावे,
अशी मागणी केल्याने कर्नाटक सरकार कोंडीत सापडले आहे.
जत तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी टँकरवरती अवलंबून
राहावे लागते. तालुक्यातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगाम वाया
गेले असून माणसांसह जनावरांचेही हाल सुरू आहेत. जत तालुक्याच्या
पूर्वभागातील 64 गावांतील परिस्थिती अत्यंत बिकट असून या गावातील
अनेक वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी वाट बघत थांबावे लागते.
ही टँकरची व्यवस्था कायमस्वरूपी बंद करायची असेल तर कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी या पूर्वभागात आले पाहिजे,
याशिवाय पर्याय नाही. यासाठी जत तालुक्यातील सर्वपक्षीय
शिष्टमंडळ घेऊन बेळगाव येथे अधिवेशन सुरू असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी,
पाणीपुरवठा मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन जत पूर्वभागाला पाणी कशा पद्धतीने येईल, याचा आराखडा त्यांना दिला असून त्यांनीही सकारात्मक असल्याचे सांगून महाराष्ट्रातील
पाणी आम्हाला सोडा आणि यातून आम्ही पूर्व भागात पाणी सोडतो, असे
त्यांनी शिष्टमंङळाला सांगितले असून यासाठी महाराष्ट्रातील सरकारने पुढाकार घेऊन तातडीने
आंतरराज्यीय करार करून जत तालुक्याच्या पूर्वभागाचा प्रश्न कायमस्वरूपी
मिटवावा, अशी मागणी होत आहे.
कर्नाटकातून
‘तुबची बबलेश्वर’चे पाणी
जत तालुक्याच्या पूर्व भागाला मिळाले पाहिजे, यासाठी ते मागणी
करत असताना सुद्धा तालुक्यातील काही राजकीय मंडळी त्याला विरोध करत आहेत. त्यामुळे हे योग्य नाही. पाण्याच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.दुष्काळ हाच
शत्रू म्हणून आपण लढा दिल्यास जत तालुका समृद्ध होईल. यासाठी
पूर्वीची जुनी योजना पूर्ण करावी. नवीन योजना होणार कधी?
एवढे पैसे आणनार कोठून? यासाठी पुन्हा अनेक वर्षे
जातील. त्यामुळे पाण्यासाठी तिष्ठत बसणार्या या भागातील जनतेला जुनीच योजना पूर्ण करून पाणी देण्याची व्यवस्था करून
या तालुक्यातील पूर्वभागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवावा, अशी
मागणी होत आहे.
जत तालुक्याला लागूनच असलेल्या मंगळवेढा व सांगोला
तालुक्यातील अनेक गावागावांत चारा छावण्या सुरू आहेत. मागेल त्या गावाला पाण्याचा टँकर दिला जातो. तसेच या
तालुक्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या सोयी-सवलती दिलेल्या आहेत. मात्र जत तालुक्यातील अनेक गावांत
अद्याप दुष्काळाच्या सोयी-सवलती मिळायला तयार नाहीत. तालुक्यातील काही थोड्याच गावात छावण्या सुरू आहेत. मात्र
बर्याच गावात अद्यापही चारा छावण्या सुरू नाहीत. त्यामुळे जनावरांचे मोठे हाल होत असून शेळ्या-मेंढ्यासह
सर्व प्रश्न अद्यापही सरकारने सोडविले नाहीत. त्यामुळे तातडीने प्रत्येक गावागावांत शेळ्या-मेंढ्या
साठी चारा छावण्या सुरू करून या दुष्काळी तालुक्यात सर्व सोयी-सवलती द्याव्यात. दुष्काळाच्या सोयी-सवलती देण्यासाठी आश्वासने देऊन निवडून आलेले लोकप्रतिनिधी
कमी पडत असून त्यामुळेच या तालुक्याला दुष्काळाच्या सोयी-सवलती
मिळायला तयार नाहीत.लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखवल्यास जत
तालुक्यात पाणी खेळेल, असा आशावाद शेतकर्यांमधून उपस्थित होत आहे.
No comments:
Post a Comment