Tuesday, June 18, 2019

म्हैसाळ योजनेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्या

जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या जत तालुक्यातील कालवा व त्याखालील पोट कॅनॉल मध्ये शेतक-यांच्या गेलेल्या जमीनीचा मोबदला गेल्या आठ दहा वर्षांपासून अद्याप मिळालेला नाही, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक हाल होत असून शासनाने तात्काळ मोबादला द्यावा,अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाने प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना दिले आहे.

जत तालुक्यामध्ये सन 2008 पासून म्हैशाळ उपसा सिंचन  योजनेअंतर्गत कालवा खुदाईचे व इतर कामे
सुरु आहेत. आता सध्या ती सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीतून मुख्य
कालवा व इतर छोटे कालवे गेलेले आहेत, अशा  बहुतांश शेतक-यांना सदर कालव्यामध्ये गेलेल्या जमीनीचा मोबदला मिळालेला नाही. शेतक-यांना आज कसण्यासाठी जमीनी नाहीत  व कालव्यामध्ये गेलेल्या
जमीनीचा मोबदलाही नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे आर्थिक हाल सुरू आहेत.  कॅनॉलचे काम जवळ जवळ पूर्णत्वादर आलेले आहे. त्या शेतक-यांना मात्र गेल्या आठ दहा वर्षांपासून मोबदला मिळालेला नाही,हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
जत तालुक्यामध्ये नेहमी भीषण दुष्काळ पडत असून गेल्या वर्षीही असाच मोठा दुष्काळ तालुक्यात पडला आहे. सध्या  शेतामध्ये जनावरांना चारा नाही, पाणी नाही इतकेच नव्हे तर लोकांनाही प्यायला पाणी नाही, अशी भीषण अवस्था जत तालुक्यातील गावांची आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत,त्याची तर अवस्था फारच बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी सदर बाब गंभीर्याने घेवून ज्या शेतक-यांच्या जमीनी कालव्यामध्ये गेलेल्या आहेत गेली 8 ते 10 वर्ष त्यांना त्यांचा मोबदला सुध्दा मिळालेला नाही. त्यांना 1 महिन्याच्या आत मोबदला मिळण्याकामी योग्य ती कार्यवाही व्हावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, कॉन्ट्रॅक्टर संघाचे नेते सलीम गवंडी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ ( म्हैसाळ उपसा योजनेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपकडून प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांना देण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, चंद्रकांत गुडोडगी, सलीम गवंडी उपस्थित होते.)

No comments:

Post a Comment