Monday, May 13, 2019

पश्‍चिम महाराष्ट्रात बायोमेट्रिक अनिवार्य करा

  जत,(प्रतिनिधी)-
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी अकरावी-बारावीला नाममात्र प्रवेश घेतात आणि लातूर परिसरातील खासगी क्लासला हजेरी लावतात.यामुळे या भागातील महाविद्यालये ओस पडत असल्याचे चित्र आहे. प्राध्यापकांनाही फार काम नसल्याने या भागातील शैक्षणिक दर्जा खालावला आहे. या भागातील महाविद्यालयांची पाहणी करावी व बायोमेट्रिक विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे
 
   लातूर पॅटर्नची भुरळ पालकांना असून अनेक पालकांनी आपली पाल्ये लातूर आणि परिसरातील खासगी क्लासला पाठवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून ही संख्या मोठी आहे. मेडिकल प्रशिक्षणासाठी आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालक मोठ्या प्रमाणात येथील क्लासला भरमसाठ फी देऊन घालत आहेत. काही विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घेतला आहे. पण परीक्षेचा फॉर्म भरताना मात्र पश्चिम महाराष्ट्रातील महाविद्यालयतच भरतात.तासिका मात्र मराठवाड्यातीलच खासगी शिकवण्यांमध्ये करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना बायोमेट्रीक सक्तीचे करावे, अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालय विनाअनुदानित कृती समितीने राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   
   या निवेदनाच्या प्रती शिक्षण आयुक्त पुणे व शिक्षण संचालक पुणे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, वैद्यकीय प्रवेश कोटा 70 30 टक्के असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा कल मात्र नाममात्र प्रवेशापुरता वाढला आहे. हा कोटा रद्द करून समान कोटा ठेवण्यात यावा, मराठवाड्यातील कनिष्ठ महाविद्यालयांवर होणारा अन्याय दूर करावा. अकरावी व बारावीसाठी 75 टक्के हजेरी अनिवार्य आहे, तरच बोर्डाचा परीक्षा फॉर्म भरता येतो. या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे पश्चिम महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांकडून होत आहे. यासाठीच गेल्यावर्षी शासनाने विद्यार्थ्यांसाठीही बायोमेट्रिक सुरू केले. याची सरकारने काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात बोगस विद्यार्थी दाखवून प्रवेशाचे प्रमाण वाढले आहे. यासाठी बायोमेट्रिक सक्तीची करावी, अशी मागणी केली आहे.     

No comments:

Post a Comment