पूर्व मोसमी सरींचा दुष्काळ;मशागतीची कामे खोळंबली
जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळाने होरपळणाऱ्या बळीराजाचा वळीवाच्या पावसानेही अपेक्षाभंग केला असून पूर्व मोसमी सरींच्या दुष्काळाने खरीप पूर्व मशागतीची कामे सध्या खोळंबली आहेत.
24 मे पासून रोहिणी नक्षत्र सुरू झाले असून या नक्षत्रात वळीवाचा पाऊस अपेक्षित असतो.या पावसाने खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग येतो.पूर्व मोसमी सरींनी हजेरी लावली असती तर दुष्काळी जनतेला दिलासा मिळाला असता. पावसाअभावी जळून जात असलेल्या उन्हाळी पिकांनाही जीवदान मिळाले असते.
परंतु यंदा भारतीय भूखंडावर मान्सूनचे उशिराने आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.पूर्व मोसमी सरी म्हणजे मान्सुनच्या आगमनाची वार्ताच असते.दुर्दैवाने यावर्षी महाराष्ट्रात वळीवाच्या पावसानेही दुष्काळी भागाकडे पाठ फिरवली आहे.गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रामध्ये केवळ 6.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. काही दिवसांपूर्वी काही सरी पडल्या मात्र म्हणावा असा त्यात जोर नव्हता.वादळी वारे होते,त्याच्याने पिकांचे नुकसान मात्र झाले.
आग ओकणाऱ्या सूर्य नारायणामुळे या सरींची ओल तव्यावर पाणी शिंपडल्या सारखी झाली.महाराष्ट्रात मान्सुनच्या आगमनाची आणखी मोठी प्रतीक्षा असल्याने दुष्काळाचे संकट दूर होण्यास वरूणराजाकडे प्रार्थना करण्याशिवाय बळीराजाच्या हाती काहीच राहिले नाही.
दरवर्षी मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह बरसणारा वळीव पाऊस यंदा पडलाच नाही. या पावसामुळे मशागतीच्या कामांना जोर आला असताच शिवाय आग ओकणाऱ्या सूर्यापासून बचाव झाला असता.पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी व्हायला हातभार लागला असता. गेल्या दोन वर्षात टँकरमुक्त म्हणून जत तालुका ओळखला जात होता,मात्र यंदा शंभर गावांना टँकरच्या मदतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.जनावरांना चारा नसल्याने 17 छावण्यांच्यामार्फत चारा उपलब्ध करून दिला जात आहे. अजूनही चारा छावण्यांची मागणी वाढत आहे. 17 जूननंतर पावसाला सुरुवात होईल,असे भाकीत हवामान खात्याने वर्तवल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. एवढ्या कालावधीत वळीव बरसल्यास थोडा फार दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी हैराण
जत,(प्रतिनिधी)-
खरीप हंगाम सुरू होण्याला महिन्याभराचा कालावधी असताना खत कंपन्यांनी 50 किलोच्या एका पोत्यामागे दोनशे ते अडीचशे रुपयांची दरवाढ केली आहे. यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना आता या खत दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
गेल्या हंगामात पाऊस न झाल्याने खरिपाचे पीक घेता आले नव्हते. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बीची सुद्धा पेरणी झाली नव्हती. पावसाअभावी दोन्ही हंगाम वाया गेले होते. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. यंदाच्या हंगामात खत कंपन्यांनी मोठी दरवाढ केली आहे.शेतकऱ्यांना खतांच्या एका पोत्यामागे दोनशे ते अडीचशे रुपये जादा मोजावे लागत आहेत. खरीप हंगामापूर्वी झालेली खताची ही दरवाढ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारी आहे.
पुरेसे खत घ्यावे म्हणून शेतकऱ्यांकडून वर्षभरापासून तयारी केली जाते.प्रसंगी बँकेकडून कर्ज काढून शेतकरी खत विकत घेतो.सध्या शेती मालाला आधारभूत किंमत नसल्याने खर्च व उत्पन्नाचा मेळ जमत नाही. त्यातच या खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. गेल्या खरीप हंगामात डीएपीच्या एका पोत्याची किंमत बाराशे रुपये होती. आता ती सुमारे चौदाशे पन्नास रुपये इतकी झाली आहे.
No comments:
Post a Comment