Monday, May 20, 2019

गोधन वाचविण्यासाठी बळीराजाची कसरत!


जत,(प्रतिनिधी)-
 गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पाण्याची भीषण पाणीटंचाई ग्रामीण भागात जाणवत आहे. जिथे मनुष्यप्राण्यावर पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली तिथे मुक्या जनावरांची काय अवस्थ असेल याची कल्पना न केलेली बरी ! मात्र अशा परिस्थितीतही गोधन वाचविण्यासाठी बळीराजा मुक्या प्राण्यांसाठी मोठी कसरत करत चारा, पाण्याची व्यवस्था करताना दिसत आहे. जणू निसर्ग बळीराजाची सत्वपरीक्षाच पाहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

 पर्यावरणात दिवसेंदिवस बदल होत आहे. हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तिन्ही ऋतू बेभरवशाचे झाले आहेत. बदलती जीवनशैली, बेसुमार वृक्षतोड नष्ट होत चाललेले जंगल, वाढती लोकसंख्या याचा परिणाम निसर्गावर होत चालला आहे. पर्यन्यवृष्टीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालवत चालली आहे. गेल्यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने यंदा राज्यात पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. राहाता तालुक्यात गतवर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने गावतळे, बंधारे कोरडेच राहिले. यापूर्वी वाहत्या असलेल्या छोट्या-छोट्या नद्या, नाले, ओढे यंदा वाहते झाले नाहीत. वर्षभरात केवळ एकदाच मोठा पाऊस झाला. अन्य नक्षत्र कोरडेच गेल्याने पिके जळून गेले. बाजरी, सोयाबीन ही पिके कशीबशी काढली.
 मात्र गहू, हरभरा, सोयाबीन व अन्य पिके मात्र पाण्याअभावी घेता आली नाहीत. उसाची परिस्थितीही तीच झाली. विहिरींनी तळ गाठला, बोअरचे पाणी गेले. कुटुंबाला पिण्याचे पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न सतावत असताना गोठ्यात बांधलेली जनावरे चारा, पाण्यासाठी हंबरडा फोडत असल्याचे पाहून बळीराजाचे डोळे पाणावत आहे. जिवापाड जपलेल्या पशुधनाची खाण्या-पिण्यासाठी होत असलेली तारांबळ पाहता एकवेळ आपल्याला जेवण नसले तरी चालेल पण मुक्या प्राण्यांना चारा, पाणी आणले पाहिजे. यासाठी बळीराजा मोठी धडपड करताना दिसत आहे. मे महिन्याचा पंधरवडा संपत आला तरी कडक उन्हाची तीव्रता कायम असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment